माजी कसोटीपटू, महाराष्ट्र क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सदाशिव रावजी तथा एस.आर. पाटील यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. भारतीय क्रिकेट संघातून खेळलेले ते कोल्हापूरचे एकमेव खेळाडू होते. त्यांच्या पश्चात दोन मुली आहेत.

गेले काही दिवस ते आजारी होते. सदाशिव यांचा जन्म कसबा ठाणे ( त. पन्हाळा ) येथे १० ऑक्टोबर १९३३ मध्ये सधन शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांना मुलांनी क्रिकेटमध्ये चमकावे अशी इच्छा होती. त्यानुसार सदाशिव आणि त्यांचे बंधू डी.आर. पाटील यांनी क्रिकेट क्षेत्रात झोकून दिले. सदाशिव यांनी मध्यमगती गोलंदाज म्हणून छाप पाडली. इंग्लंडमधील लँकेशायर, नॉर्थ स्टॅपोर्डशायर, नॅन्टविच या क्लबकडून खेळताना फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दुहेरी बाजूने  ठसा उमटवला.

महाराष्ट्र रणजी संघाकडून त्यांनी १९५२ ते १९६४ या कालावधीत खेळताना ३६ सामन्यांत तीन अर्धशतकांसह ८६६ धावा करतानाच ३०.६६ सरासरीने ८३ बळी मिळवले. ३८ धावांत निम्मा संघ गारद करण्याची त्यांची सर्वोत्तम कामगिरी ठरली. कसोटीत संधी मिळणे बंद झाल्यावर त्यांनी पुन्हा महाराष्ट्र संघाकडून खेळणे सुरू ठेवले होते. २०१७ मध्ये कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघटनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले होते. डिसेंबर १९५५ मध्ये मुंबईत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांसाठी भारतीय संघात त्यांची प्रथमच निवड करण्यात आली होती.