ओसाका, क्विटोव्हा दुसऱ्या फेरीत

पॅरिस: टेनिसमधील त्रिमूर्तीचे वर्चस्व मोडीत काढण्याची क्षमता असलेल्या ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीमला रविवारी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्याच फेरीतून गाशा गुंडाळावा लागला. तीन ग्रँडस्लॅम विजेत्या अँजेलिक कर्बरचेही आव्हान संपुष्टात आले. तर नाओमी ओसाका, पेत्रा क्विटोव्हा यांनी विजयी सलामी नोंदवली.

स्पेनच्या पाब्लो अँडुआरने चौथ्या मानांकित थीमला ४-६, ५-७, ६-३, ६-४, ६-४ असे पिछाडीवरून नमवले. पाच सेटपर्यंत लांबलेला हा सामना तब्बल ३ तास आणि १२ मिनिटे रंगला. गतवर्षी अमेरिकन स्पर्धा जिंकणाऱ्या थीमला कारकीर्दीत प्रथमच फ्रेंच स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. त्याशिवाय सलग दुसऱ्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत त्याला पहिले दोन सेट जिंकूनही सामना जिंकता आला नाही. दुसरीकडे काही आठवडय़ांपूर्वीच रॉजर फेडररला धूळ चारणाऱ्या अँडुआरने थीमवर मात करून  स्वत:ची क्षमता सिद्ध केली.

अन्य  लढतींमध्ये २३व्या मानांकित कॅरेन खाचानोव्हने जिरी व्हेस्लीवर ६-१, ६-२, ६-३ अशी मात केली. स्पेनच्या ११व्या मानांकित रॉबटरे बटिस्टा अगूतने मारिओ मार्टिनेझवर ६-४, ६-४, ६-२ असा विजय मिळवला. १२व्या मानांकित पाब्लो कॅरेनो बुस्टाने नॉर्बट गॅम्बोसवर ६-३, ६-४, ६-३ अशी सरशी साधून दुसरी फेरी गाठली. १६व्या मानांकित ग्रिगोर दिमित्रोव्हने दुखापतीमुळे मार्कस गिरोनविरुद्धचा सामना चौथ्या सेटमध्ये अर्धवट सोडला. माघार घेतली त्यावेळी तो ६-२, ६-४, ५-७ असा आघाडीवर होता.

महिला एकेरीत क्रमवारीत १३९व्या स्थानी असलेल्या बिगरमानांकित अ‍ॅनेलिना कॅलिनिनाने जर्मनीच्या कर्बरला ६-२, ६-४ अशी सरळ दोन सेटमध्ये धूळ चारली. सलग तिसऱ्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत कर्बरला सलामीलाच पराभव पत्करावा लागला. तर कॅलिनिनाने पहिल्याच ग्रँंडस्लॅम स्पर्धेत दुसरी फेरी गाठण्याची किमया साधली. चेक प्रजासत्ताकच्या ११व्या मानांकित क्विटोव्हाने ग्रीट मिनेनला ६-७ (३-७), ७-६ (७-५), ६-१ असे पिछाडीवरून नमवले. जपानच्या दुसऱ्या मानांकित ओसाकाने मारिया टिगचा ६-४, ७-६ (७-४) असा दोन सेटमध्ये फडशा पाडला.  ओसाकाला यंदा सलग तिसरे ग्रँडस्लॅम जिंकण्याची संधी आहे.

’  वेळ : दुपारी २.३० वा.

*  प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट २

’  वेळ : दुपारी ३.३० वा.

*  प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १

ओसाकावर स्पर्धेबाहेर जाण्याची टांगती तलवार

जपानची टेनिसपटू नाओमी ओसाकाने रविवारी पहिल्या फेरीतील विजयानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंशी संवाद साधण्यास नकार दिला. त्यामुळे तिला १५ हजार अमेरिकन डॉलर इतका दंड ठोठावण्यात आला. त्याशिवाय यापुढील लढतीनंतरही ओसाकाने असे वर्तन केल्यास तिला स्पर्धेतून बाहेर काढण्यात येईल, असेही पंचांनी सांगितले.