गौतम गंभीरने दिल्लीच्या रणजी क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या चेहऱ्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळावी आणि नवोदित खेळाडूंकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात यावी, यासाठी त्याने हा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयानंतर DDCAने रणजी करंडक स्पर्धेसाठी दिल्ली संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी नितीश राणाकडे सोपवली असून२०१८-१९च्या रणजी हंगामात ध्रुव शोरेय उपकर्णधार असणार आहे.

कर्णधारपद सोडण्याची आणि नव्या खांद्यावर सोपवण्याची हीच योग्य वेळ आहे, असे सांगत त्याने कर्णधारपद सोडले असे ट्विट त्याने केले आहे. तसेच मी संघात राहून सामने जिंकवून देण्यात कर्णधाराला मदत करेन, असेही त्याने म्हटले आहे.

राज्य संघाचे निवड समिती प्रमुख भंडारी यांच्याकडे गंभीरने कर्णधारपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. युवा खेळाडूकडे ही जबाबदारी सोपविण्यात यावी, अशी विनंती त्याने केली आहे, अशी माहिती दिल्ली क्रिकेट असोसिएशनने दिली आहे. नितीश राणाने २४ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४६च्या सरासरीने धावा केल्या आहेत, तर शोरेयने २१ सामन्यांत दिल्लीचे प्रतिनिधित्व केले आहे. रणजीच्या या हंगामातील दिल्लीचा पहिला सामना १२ नोव्हेंबरला फिरोज शाह कोटला मैदानावर होणार आहे.