करोना काळानंतर सुरू झालेल्या क्रिकेट मालिकांमध्ये इंग्लंडचा पहिला पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने वन डे मालिकेत इंग्लंडला २-१ने पराभूत करत मालिकेवर नाव कोरले. आधी वेस्ट इंडिज, मग आयर्लंड आणि त्यानंतर पाकिस्तान यांच्याशी झालेल्या क्रिकेट मालिकांमध्ये इंग्लंडने विजय संपादन केला. तर ऑस्ट्रेलियाविरूद्धची टी२० मालिका बरोबरीत सुटली. पण अखेर इंग्लंडला वन डे मालिकेत पराभवाची चव चाखावी लागली. धडाकेबाज खेळ करणाऱ्या मॅक्सवेलला सामनावीर व मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.

इंग्लंडने तिसऱ्या वन डे सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दोन चेंडूत जेसन रॉय आणि कर्णधार जो रूट यांचे बळी गमावले. त्यानंतर जॉनी बेअरस्टोने एकहाती खिंड लढवली. त्याने १२६ चेंडूत ११२ धावा केल्या. त्यात १२ चौकार आणि २ षटकार समाविष्ट होते. बेअरस्टो बाद झाल्यावर खालच्या फळीतील सॅम बिलिंग्स (५७) आणि ख्रिस वोक्स (नाबाद ५३) यांनी दमदार फलंदाजी करत संघाला त्रिशतकी मजल मारून दिली. स्टार्क आणि झॅम्पाने तीन-तीन बळी टिपले.

३०३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. ठराविक अंतराने गडी बाद होत राहिल्याने त्यांची अवस्था ५ बाद ७३ अशी झाली होती. पण त्यानंतर अलेक्स कॅरी आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांनी तब्बल २१२ धावांची भागीदारी केली. दोघांनाही दमदार शतकं झळकावली. कॅरीने ७ चौकार व २ षटकारांसह १०६ धावा केल्या, तर मॅक्सवेलने ४ चौकार आणि ७ षटकारांसह १०८ धावा केल्या.

त्यानंतर २ चेंडूंचा खेळ शिल्लक राखून मिचेल स्टार्कने संघाला विजय मिळवून दिला.