आगामी विंडीज व ऑस्ट्रेलियातील टी-२० मालिकेत धोनीची संघात निवड न झाल्याने गेल्या काही दिवसांमध्ये एकच आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. धोनी आता पूर्वीसारखा फलंदाजी करत नाही, व आगामी २०२० टी-२० विश्वचषकात धोनी खेळणार नसेल तर त्याला आताच्या टी-२० मालिकेत संधी देण्यास काहीच अर्थ नसल्याचं मत निवड समितीने व्यक्त केलं होतं. मात्र यष्टीरक्षक म्हणून धोनीला आजही पर्याय नसल्याचं त्याने पुन्हा एकदा स्पष्ट केलं. विंडीजविरुद्ध चौथ्या सामन्यात धोनीने जाडेजाच्या गोलंदाजीवर किमो पॉलला अवघ्या काही सेकंदात यष्टीचीत करुन आपल्यात अजुनही तितकीच उर्जा असल्याचं दाखवून दिलं.

भारताने दिलेलं ३७८ धावांचं आव्हान पार करताना, विंडीजची फलंदाजी पुरती कोलमडली. अखेरच्या फळीत जेसन होल्डर, किमो पॉल आणि केमार रोच यांनी थोडी फटकेबाजी करत संघाची लाज राखली. २८ व्या षटकात जाडेजाच्या गोलंदाजीवर धोनीने किमो पॉलला यष्टीचीत केलं, त्यावेळी एका क्षणासाठी जाडेजालाही आपल्याला ती विकेट मिळाली आहे यावर विश्वास बसला नाही. मात्र धोनी त्या विकेटबद्दल निश्चींत होता, अखेर तिसऱ्या पंचांच्या पाहणीत किमो पॉल यष्टीचीत असल्याचं स्पष्ट झालं. धोनीने 0.08 सेकंदांमध्ये किमो पॉलच्या माघारी धाडलं. धोनीच्या वेगवान स्टम्पिंगपैकी हे एक स्टम्पिंग मानलं जात आहे.