कोलकाता : जागतिक बॅडमिंटन संघटनेचे (बीडब्ल्यूएफ) वेळापत्रक व्यग्र आहे. पण सिंधूसारख्या दर्जेदार खेळाडूने तक्रार न करता जुळवून घेणे आवश्यक आहे, असे मत राष्ट्रीय बॅडमिंटनचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केले आहे. गेल्या वर्षी सिंधूला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे सुवर्णपदक वगळता एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही.

‘‘व्यग्र वेळापत्रकाचा फटका अव्वल खेळाडूंना बसतो. मात्र ही समस्या जगातील प्रत्येक खेळाडूची आहे. अर्थातच सिंधूने याविषयी तक्रार न करता त्याच्याशी जुळवून घेणे अपेक्षित आहे. सिंधू तिच्या चुका दुरुस्त करण्यासाठी मेहनत घेत आहे,’’ असे गोपीचंद यांनी सांगितले.

सिंधूच्या ऑलिम्पिक तयारीसंदर्भात गोपीचंद म्हणाले, ‘‘पार्क ताये-सँग हेदेखील सिंधूला मार्गदर्शन करीत आहेत. सरावतज्ज्ञ श्रीकांत आणि फिजियो तिच्या तंदुरुस्तीवर मेहनत घेत आहेत. ऑलिम्पिकमध्ये सिंधूला कॅरोलिना मॅरिन, ताय झू यिंग यांसारख्या खेळाडूंचे आव्हान आहे. मात्र उत्तम तयारीच्या बळावर सिंधूकडून पदक अपेक्षित आहे,’’ असे गोपीचंद यांनी म्हटले आहे.

सायना आणि सिंधू यांना एकत्र हाताळणे कठीण!

सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या दोन मातब्बर खेळाडूंना एकत्र हाताळणे कठीण आहे, असे गोपीचंद यांनी म्हटले. ‘‘मला स्वप्नातसुद्धा सायना आणि सिंधू यांच्यापैकी माझी आवडती शिष्या ठरवता येणार नाही. अनेक वर्षे या दोघींना एकत्र हाताळणे कठीण होते. पण मी ती जबाबदारी पार पाडली. त्या दोघींचा प्रवास स्वतंत्र आहे. मात्र सायना माझी अकादमी सोडून दुसऱ्या अकादमीत गेली, तेव्हा मी नाराज झालो होतो,’’ असे गोपीचंद यांनी सांगितले.