क्रिकेटच्या मैदानात स्लेजिंग करुन प्रतिस्पर्धी संघाला नामोहरम करण्यात ऑस्ट्रेलियन संघ माहिर आहे. जुन्या काळात रिकी पाँटींग, मॅथ्यू हेडन, गिलख्रिस्ट, ब्रेट ली असे अनेक दिग्गज खेळाडू स्लेजिंगसाठी ओळखले जायचे. याव्यतिरीक्त पाकिस्तानचे खेळाडूही मैदानात स्लेजिंगसाठी ओळखले जायचे. परंतू ऑस्ट्रेलियन संघाने मैदानात आपला ज्या पद्दतीने दबदबा निर्माण केला तसा दबदबा निर्माण करणं कोणत्याही संघाला जमलं नाही. २००२ साली शारजाह कसोटी दरम्यान ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मॅथ्यू हेडनने पाकिस्तानच्या शोएब अख्तरला अशाच पद्धतीने स्लेजिंग करत हैराण केलं होतं.

“सुरुवातीला मी त्याला बी- ग्रेड चा अभिनेता म्हणायचो, यामुळे तो खूप चिडायचा. आम्ही शारजाह मध्ये खेळत होतो आणि वातावरण चांगलंच तापलेलं होतं. मैदानात उतरत असताना अख्तरने मला आज मी तुझी वाट लावणार आहे असं बोलून धमकवायचा प्रयत्न केला. मी देखील त्याला त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर देऊन, वाट पाहतोय असं म्हणालो. परंतू तुला असं करण्यासाठी फक्त ३ षटकं आहेत, ३ षटकांनंतर मी आऊट होणार नाही.” यावेळी हेडनने आपलं डोकं चालवत त्या सामन्यात भारतीय पंच एस.वेंकटराघवन यांचं नाव घेऊन शोएबला स्लेजिंग करण्याचा प्रयत्न केला. सामना सुरु झाल्यानंतर शोएब हेडनला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक युद्धही रंगलं. हेडन क्रिकेट पॉ़डकास्ट कार्यक्रमात बोलत होता.

शोएबच्या एका चेंडूवर मी फटका खेळला, त्यावेळी त्याने माझ्यापाशी येऊन विचारलं तुझा प्रॉब्लेम काय आहे?? मी सरळ वेंकट यांच्यापाशी गेलो आणि म्हणालो मी सरळ शांतमार्गाने खेळण्याचा प्रयत्न करतोय. पण नियम पाहता तुम्ही कोणालाही जाऊन शिवीगाळ करु शकत नाही. शोएब त्या सामन्यात मला LBW बाद करण्याचा प्रयत्न करणार आणि वेंकट सहजासहजी कोणालाही LBW देत नाहीत हे मला माहिती होतं. यानंतर खूप प्रयत्न केल्यानंतर शोएब अखेरीस शांत झाला…यानंतर तो थोडा थकल्यासारखाही वाटत होता. या सामन्यात हेडनने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत शतकही झळकावलं होतं.