लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालला कारकीर्दीत जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक पटकावता आलेले नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी सायना प्रयत्नशील आहे. या पदकाच्या वाटचालीत दुखापतींनी अडथळा निर्माण केला आहे. मात्र १० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेपूर्वी दुखापतीतून सावरेन, अशी आशा सायनाने व्यक्त केली.
‘‘खांद्यामध्ये त्रास जाणवतो आहे. मात्र जागतिक अजिंक्यपद स्पर्धा सुरू होण्यास बराच कालावधी आहे,’’ असे सायनाने सांगितले. २०१३मध्ये या स्पर्धेपूर्वी सायनाला पोटाच्या विकाराने त्रस्त केले होते. २००९ मध्ये या स्पर्धेपूर्वी कांजिण्याच्या आजाराचे निदान झाले होते. यंदाच्या वर्षांत मार्चमध्ये ऑल इंग्लंड स्पर्धेदरम्यान सायनाची खांद्याची दुखापत बळावली होती.
ऑलिम्पिक पदकासह असंख्य सुपर सीरिज स्पर्धाची जेतेपदे नावावर असणाऱ्या सायनाला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदकाने सातत्याने हुलकावणी दिली आहे. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या सायना यंदा जेतेपदासाठी शर्यतीत आहे. यंदा सायनाने सय्यद मोदी ग्रां.प्रि. आणि इंडिया ओपन सुपर सीरिज स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सायनाची सलामी हाँगकाँगच्या च्युंग गान यि आणि इंडोनेशियाच्या काटी तोलमॉफशी यांच्यातील विजेतीशी होणार आहे. उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत तिचा मुकाबला जपानच्या ताकाहाशीशी होण्याची शक्यता आहे. हा टप्पा पार केल्यास सायनासमोर चीनच्या वांग यिहानचे खडतर आव्हान असेल. स्पर्धेच्या वेळापत्रकाविषयी विचारले असता सायना म्हणाली, ‘‘सायाका ताकाहाशी आणि वांग यिहान या माझ्याच गटात असल्याने प्रत्येक लढत खडतर असणार आहे. तंदुरुस्त होऊन दमदार कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल.’’जपानच्या ताकाहाशीविरुद्ध सायनाची कामगिरी ३-० तर वांग यिहानविरुद्ध २-९ अशी आहे. ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेत सायनाने वांगवर मात केली होती.