चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेत इंग्लंडनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही बांगलादेशचा सलामीवीर तमीम इक्बालची फलंदाजी चांगलीच बहरली. पण झुंजार खेळी करणाऱ्या तमीमला अन्य फलंदाजांची साथ न  बांगलादेशला १८२ धावा करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पावसाचे आगमन झाले तेव्हा ऑस्ट्रेलियाची १६ षटकांत १ बाद ८३ अशी स्थिती होती.

बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या सलामीवीरांनी सावध सुरुवात केली. पण सहाव्या षटकात त्यांना पहिला धक्का बसला आणि ठराविक फरकाने त्यांचे फलंदाज बाद होत राहिले. एका बाजूने फलंदाज बाद होत असले तरी तमीमने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा समर्थपणे सामना केला. परिस्थिती बिकट असली तरी तमीमने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीवर प्रहार करण्याची संधी सोडली नाही. बांगलादेशची ३ बाद ५३ अशी अवस्था असताना तमीमला थोडय़ाफार प्रमाणात शकिब अल हसनची (२९) साथ मिळाली आणि या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी रचली. हे दोन्ही अनुभवी फलंदाज आता बांगलादेशला सन्मानजनक धावसंख्या उभारून देतील, असे वाटत असताना ट्रेव्हिस हेडने शकिबला बाद केले. त्यानंतर पुन्हा एकदा तमीमने बांगलादेशच्या फलंदाजीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. तमीमने संयतपणे अर्धशतक पूर्ण केल्यावर तो शिताफीने शतकाच्यासमीप पोहोचू लागला. तमीम नव्वदीत पोहोचला आणि आता तो सलग दुसरे शतक झळकावण्यासाठी सज्ज असल्याचे वाटत होते. पण वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला मोठा फटका मारण्याच्या नादात तमीमने आपली विकेट आणि सलग दुसरे शतक झळकावण्याची संधी गमावली. तमीमने सहा चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ९५ धावांची खेळी साकारली. तमीम बाद झाल्यावर फक्त एका धावेमध्ये बांगलादेशने तीन फलंदाज गमावले. तमीमला बाद केल्यावर त्याच षटकात स्टार्कने बांगलादेशच्या अजून दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतरच्या षटकात अजून एक बळी मिळवत चार बळींसह स्टार्कने बांगलादेशच्या अखेरच्या फलंदाजालाही बाद केले.

बांगलादेशच्या माफक आव्हानाचा ऑस्ट्रेलियाने आपल्या शैलीत पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. डेव्हिड वॉर्नरने यावेळी सुरुवातीला आक्रमक रुप धारण केले होते, पण कालांतराने त्याचे आक्रमण थंडावले आणि एकेरी-दुहेरी धावांचा रतीब घालायला त्याने सुरुवात केली. चांगली सुरुवात झाल्यावरही आरोन फिंचला (१९) यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. फिंच बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या कर्णधार स्टीव्हन स्मिथने (नाबाद २२) आपल्या खास पठडीतल्या फटक्यांनिशी धावा जमवायला सुरुवात केली. वॉर्नर आणि स्मिथ ही जोडी स्थिरस्थावर होऊन आता ऑस्ट्रेलियाला सामना जिंकवणार, असे वाटत असताना पावसाचे आगमन झाले आणि खेळ थांबला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाची १६ षटकांत १ बाद ८३ अशी स्थिती होती. वॉर्नरने ४४ चेंडूंत २ चौकारांसह नाबाद ४० धावा केल्या होत्या.

संक्षिप्त धावफलक

बांगलादेश : ४४.३ षटकांत सर्व बाद १८२ (तमीम इक्बाल ९५; मिचेल स्टार्क ४/२९) वि. ऑस्ट्रेलिया : १६ षटकांत १ बाद ८३ (डेव्हिड वॉर्नर नाबाद ४०; रुबेल होसेन १/२१) (धावफलक अपूर्ण).

तमीम इक्बाल

  • धावा ९५
  • चेंडू ११४
  • चौकार ६
  • षटकार ३