चॅम्पियन्स करंडकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने बांगलादेशवर ९ गडी राखून मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. येत्या रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत भारताचा सामना होणार आहे. या सामन्यात मुंबईकर रोहित शर्माने शतक झळकावलं, मात्र कर्णधार विराट कोहलीची ९६ धावांची खेळीसुद्धा भाव खाऊन गेली.

या सामन्यादरम्यान विराट कोहली सर्वात जलद ८ हजार धावा करणारा वन डे फलंदाज ठरलाय. विराट कोहलीने हा कारनामा अवघ्या १७५ इनिंगमध्ये करुन दाखवला आहे. यापूर्वी हा विक्रम दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हीलियर्सच्या नावावर जमा होता. डिव्हीलियर्सने १८२ इनिंगमध्ये हा विक्रम केला होता.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वात ८ हजार धावा करण्याचा विक्रम भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नावावर जमा होता. एबी डिव्हीलियर्सने तब्बल १३ वर्षांनी हा विक्रम आपल्या नावे केला होता. अखेर काल डिव्हीलियर्सच्या आयपीएल संघाचा साथीदार असलेल्या कोहलीने हा विक्रम आपल्या नावे करुन त्यावर भारतीय खेळाडूचं नाव प्रस्थापित केलंय.

आयपीएलमध्ये फारशी चमकदार कामगिरी न करु शकलेल्या विराटची चॅम्पियन्स करंडकात बॅट मात्र चांगलीच तळपली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याचा अपवाद वगळला तर प्रत्येक सामन्यात कोहलीने अर्धशतकी खेळी केली आहे.विराट कोहली व्यतिरीक्त या यादीत सौरव गांगुली तिसऱ्या, सचिन तेंडुलकर चौथ्या आणि एमएस धोनी सहाव्या क्रमांकावर आहेत.

याचवर्षी दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हाशिम अमलाने कोहलीचा विक्रम मोडला होता. कोहलीने वनडे मध्ये १६६ डावांमध्ये सात हजार धावा केल्या होत्या. अमलाने मात्र १५० इनिंग्जमध्येच ही कामगिरी बजावत सर्वात वेगवान 7 हजार धावा करण्याचा विक्रम रचला. विशेष म्हणजे अमलाने वन डे मध्ये सर्वात वेगवान २ हजार, ३ हजार, ४ हजार, ५ हजार आणि ६ हजार धावा केल्या आहेत. ७ हजारचाही रेकॉर्ड तोडल्यानंतर कोहलीने रचलेला ८ हजारचा विक्रमही अमला मोडित काढणार का, हे लवकरच स्पष्ट होईल.