भारतीय संघाविरुद्धच्या तिसऱया कसोटीत ‘सेव्ह गाझा, फ्री पॅलेस्टाइन’ असा संदेश देणारा बँड लावून मैदानावर उतरल्याने इंग्लंडचा क्रिकेटपटू मोईन अली वादाच्या भोवऱयात सापडला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या(आयसीसी) आचारसंहिता नियमांचा भंग केल्याप्रकरणी मोईन अलीची चौकशी होणार आहे. त्यात दोषी आढळल्यास मोईन अली अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
गाझा पट्टीत रक्तपात सुरूच
महिन्याभरापासून हमासची सत्ता असलेल्या गाझा पट्टीत इस्त्रायला आणि हमास यांच्यात संघर्ष सुरू आहे. इस्त्रायलकडून गाझापट्टीवर हल्ले सुरू आहेत. यात आतापर्यंत हजारो नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. गाझा पट्टीत सुरू असलेल्या या अशांततेचा निषेध करण्याच्या प्रयत्नात क्रिकेटपटू मोईन अलीने भारताविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱया कसोटी सामन्यादरम्यान गाझाला वाचविण्याचा संदेश देणारा बँड हातात घातला होता. मात्र, त्यासाठी त्याने आयसीसी किंवा इंग्लंड क्रिकेट मंडळाची परवानगी घेतलेली नसल्याने मोईन अलीवर कारवाई होण्याची शक्यता आहे.