कठीण परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलियाने गुरुवारी वेस्ट इंडिजवर मिळवलेला विजय. ५ बाद ७९ अशा स्थितीतून नॅथन कोल्टर-नाइल आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या झुंजार अर्धशतकी खेळीनंतर ऑस्ट्रेलियाने २८८ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली. त्यानंतर विजयाचे पारडे वेस्ट इंडिजच्या बाजूने झुकले असताना मिचेल स्टार्कने भेदक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला १५ धावांनी विजय मिळवून दिला.

ऑस्ट्रेलियाचे २८९ धावांचे उद्दिष्ट गाठताना वेस्ट इंडिजला दुसऱ्याच षटकांत सलामीवीर इविन लुइसच्या (१) रूपाने पहिला धक्का बसला होता. ख्रिस गेलला पंचांच्या चुकीमुळे दोन वेळा जीवदान मिळाल्यानंतरही मोठी खेळी साकारता आली नाही. २ बाद ३१ अशी केविलवाणी अवस्था विंडीजची झाली असताना शाय होप आणि निकोलस पूरन यांनी डावाला आकार दिला. या दोघांनी तिसऱ्या गडय़ासाठी ६८ धावांची भागीदारी रचल्यानंतर पूलचा फटका मारताना पूरनने (४०) आपला बळी गमावला.

शिमरॉन हेटमायर आणि होप यांची जोडी जमली असताना चोरटी धाव घेण्याच्या नादात हेटमायर (२१) धावचीत होऊन माघारी परतला. होपने एक बाजू लावून धरत आपले अर्धशतक साजरे केले. मात्र पॅट कमिन्सने ६८ धावांवर त्याची खेळी संपुष्टात आणली. त्यानंतर कर्णधार जेसन होल्डरने शानदार खेळी करत आंद्रे रसेलच्या साथीने वेस्ट इंडिजच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. पण गरज नसतानाही स्टार्कला फटकेबाजी करण्याच्या नादात रसेलने (१५) आपला बळी गमावला. स्टार्कने होल्डरला (५१) माघारी पाठवल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा विजय जवळपास निश्चित झाला होता. अखेर स्टार्कने शेल्डन कॉट्रेलचा त्रिफळा उडवत सामन्यातील पाचवा बळी मिळवून ऑस्ट्रेलियाच्या विजयावर मोहोर उमटवली.

दरम्यान, सुरुवातीच्या पडझडीनंतरही स्मिथ आणि कोल्टर-नाइलच्या अर्धशतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात २८८ धावा उभारल्या. आरोन फिंच (६), डेव्हिड वॉर्नर (३), उस्मान ख्वाजा (१३) आणि ग्लेन मॅक्सवेल (०) हे ऑस्ट्रेलियाचे अव्वल फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर स्मिथने मैदानावर ठाण मांडत एका बाजूने किल्ला लढवला.

मार्क्स स्टॉइनिस १९ धावांचे योगदान देऊन माघारी परतल्यामुळे ऑस्ट्रेलियाची स्थिती ५ बाद ७९ अशी झाली होती. मात्र स्मिथने अ‍ॅलेक्स कॅरेच्या साथीने सहाव्या गडय़ासाठी ६८ धावांची भर घालत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. त्यानंतर कोल्टर-नाइलने ६० चेंडूंत ९२ धावांची अविश्वसनीय खेळी करीत ऑस्ट्रेलियाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. विंडीजकडून कालरेस ब्रेथवेटने तीन तर आंद्रे रसेल, शेल्डन कॉट्रेल यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया : ४९ षटकांत सर्व बाद २८८ (नॅथन कोल्टर-नाइल ९२, स्टीव्ह स्मिथ ७३, अ‍ॅलेक्स कॅरे ४५; कालरेस ब्रेथवेट ३/६७, आंद्रे रसेल २/४१) विजयी वि. वेस्ट इंडिज : ५० षटकांत ९ बाद २७३ (शाय होप ६८, जेसन होल्डर ५१; मिचेल स्टार्क ५/४६, पॅट कमिन्स २/४१). ’ सामनावीर : नॅथन कोल्टर नाइल