टीम इंडियाने विश्वचषकात पाकिस्तानवर ८९ धावांनी मात केली. भारताने प्रथम फलंदाजी करून पाकिस्तानपुढे ३३७ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची अवस्था ३५ षटकात ६ बाद १६६ अशी झाली होती. ३५ व्या षटकानंतर पाऊस पडल्यामुळे हे आव्हान डकवर्थ लुईस नियमानुसार उर्वरित ५ षटकात १३६ धावा अशा स्वरूपाचे करण्यात आले. हे आव्हान पाकिस्तानला पेलले नाही.

सामन्यात भारतीय फलंदाजांच्या आक्रमक खेळापुढे पाकिस्तानचे गोलंदाज पुरते हतबल झाले. नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय पुरता फसला. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी १३६ धावांची शतकी भागीदारी केली. दोघांनीही अर्धशतक केले. याशिवाय कर्णधार विराट कोहली यानेही दमदार अर्धशतक केले. त्याने ६५ चेंडूत ७७ धावा केल्या. त्याने फटकेबाजी करताना गोलंदाजांची पिसे काढली.

या दरम्यान पाकिस्तानचा गोलंदाज इमाद वसीम याने कोहलीपुढे चक्क हात जोडल्याची एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. क्रिक ट्रॅकरच्या वृत्तानुसार विराटने एका चेंडूवर एकेरी धाव घेतली आणि तो धावत नॉन स्ट्राईकवर गेला. त्यावेळी इमादने चक्क कोहलीला बाद होण्याची विनंती केली आणि त्याच्यासमोर हात जोडले.

हा पहा व्हिडीओ –

त्यानंतर भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात अडखळती झाली. इमाम उल-हक विजय शंकरच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. यानंतर सलामीवीर फखार झमान आणि बाबर आझम यांनी दुसऱ्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. या दरम्यान फखार झमानने आपलं अर्धशतक साजरं केलं. अखेरीस कुलदीप यादवने बाबर आझमचा त्रिफळा उडवत पाकिस्तानची जोडी फोडली. केवळ दोन धावांनी बाबर आझमचं अर्धशतक हुकलं. त्यानंतर पाकिस्तानच्या डावाला गळती लागली. फखार झमान, मोहम्मद हाफिज, शोएब मलिक हे मातब्बर फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतत राहिले.

मधल्या फळीत कर्णधार सर्फराज अहमद आणि इमाद वासिम यांनी थोडीफार झुंज दिली. पण वरुणराजाने पाकिस्तानसमोरचं लक्ष्य आणखीन कठीण करुन ठेवलं. विजय शंकरने सरफराजचा त्रिफळा उडवत पाकिस्तानला बॅकफूटला ढकललं. यानंतर विजयासाठी आवश्यक असणारं लक्ष्य पाकिस्तानचा संघ पूर्ण करु शकला नाही. भारताकडून विजय शंकर, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.