भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक श्रीधर यांना विश्वास

विलगीकरणाच्या कठोर नियमांमुळे भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पुरेसा सराव करण्याची संधी मिळणार नाही. मात्र सध्याचे खेळाडू मानसिकदृष्ट्या कणखर असल्याने या आव्हानावरही ते सहज मात करतील, अशी आश्वासक प्रतिक्रिया भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी व्यक्त केली.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २ जून रोजी इंग्लंडला रवाना होणार आहे. १८ ते २२ जूनदरम्यान जागतिक अजिंक्यपदाचा अंतिम सामना होणार आहे. या लढतीपूर्वी भारतीय खेळाडूंना किमान १० दिवस विलगीकरणाला सामोरे जावे लागणार असून यादरम्यान त्यांना सरावाची परवानगी मिळेल की नाही, याबाबत अद्याप साशंकता आहे. न्यूझीलंड मात्र २ जूनपासून इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे.

‘‘करोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक दौऱ्यावर विविध आव्हानांचा सामना करावा लागेल, याची आम्हाला कल्पना आहे. परंतु अपुऱ्या सरावासाठी आम्ही तक्रार करू शकत नाही. भारतीय संघातील सध्याचे खेळाडू हे मानसिकदृष्ट्या किती कणखर आहेत, हे गेल्या वर्षभरात आपल्याला दिसून आले. त्यामुळे इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर सरावाविनाही खेळण्यासाठी आम्ही सज्ज आहोत,’’ असे श्रीधर म्हणाले.

द्रविडमुळे भारताची युवा फळी गुणी -चॅपेल

सिडनी : गेल्या काही वर्षांत देशांतर्गत क्रिकेटमधून असंख्य परिपक्व खेळाडू उदयास आले आहेत. याचे श्रेय राहुल द्रविडला जाते. द्रविडने ऑस्ट्रेलियातील माजी क्रिकेटपटूंशी सातत्याने संवाद साधून येथील पायाभूत सुविधांविषयी जाणून घेतले आणि मग त्याच प्रकारे भारतातही मोहीम राबवली, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपेल यांनी व्यक्त केले आहे.

शार्दूलकडून अष्टपैलूत्व सिद्ध -अरुण

नवी दिल्ली : हार्दिक पंड्याच्या अनुुपस्थितीत मुंबईकर शार्दूल ठाकूरने अष्टपैलू खेळाडूची भूमिका चोख बजावत स्वत:ला सिद्ध केले, असे मत भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी व्यक्त केले आहे. हार्दिक गोलंदाजी करण्याइतपत तंदुरुस्त नसल्यामुळे शार्दूलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत वेगवान अष्टपैलूची भूमिका बजावली.