भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी २० सामन्यात ऑस्ट्रेलियाने ७ गडी राखून विजय मिळवला. ग्लेन मॅक्सवेलने झंझावती शतक (११३*) ठोकत ऑस्ट्रेलियाला एकहाती विजय मिळवून दिला. भारताने दिलेले १९१ धावांचे मोठे लक्ष्य त्याच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २ चेंडू राखून पार केले. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियाने २ सामन्यांची टी २० मालिका २-० अशी जिंकली. पण या सामन्यात विराट कोहलीने एक विक्रम केला.

विराटने नाबाद ७२ धावांची तडाखेबाज खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावरच भारताने १९० धावांचा टप्पा गाठला. विराटने ३८ चेंडूत नाबाद ७२ धावा फटकावल्या. त्यात २ चौकार आणि ६ षटकारांची आतषबाजी त्याने केले. या बरोबरच त्याने टी २० मध्ये २२०० धावांचा टप्पा पार केला. महत्वाचे म्हणजे त्याने केवळ ६७ डावांमध्ये हा इतिहास रचला आणि विश्वविक्रम केला. त्याने सर्वात कमी डावांत २२०० धावांचा टप्पा गाठला.

या विक्रमाबरोबरच विराट टी २० मध्ये २२०० धावांचा टप्पा गाठणारा चौथा खेळाडू ठरला आहे. या आधी उपकर्णधार रोहित शर्मा, न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल आणि पाकिस्तानचा शोएब मलिक या तिघांनी हा टप्पा गाठला आहे. रोहितच्या नावे ९४ डावांत टी २० मध्ये सर्वाधिक २३३१ धावा आहेत. पाठोपाठ गप्टिलने ७६ डावांत २२७२ धावा लगावल्या आहेत. तर शोएब मलिकने १११ सामन्यात २२६३ धावा केल्या आहेत.

दरम्यान, दरम्यान, नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या राहुलचे अर्धशतक दुसऱ्या सामन्यात हुकले. तो २६ चेंडूत ४७ धावांची फटकेबाज खेळी करून बाद झाला. त्यानंतर धोनीच्या २३ चेंडूत ४० धावा आणि विराटच्या ३८ चेंडूत नाबाद ७२ धावा यांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियापुढे १९१ धावांचे आव्हान ठेवले होते. १९१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने एकहाती किल्ला लढवला. त्याला जोरदार फटकेबाजी करणाऱ्या डार्सी शॉर्टची काही काळ साथ मिळाली. शॉर्ट ४० धावांवर झेलबाद झाला. पण मॅक्सवेलने डाव सांभाळला आणि फटकेबाजी करत शतक ठोकले. त्याने ७ चौकार आणि ९ षटकार ठोकत ५५ चेंडूत नाबाद ११३ धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलला सामनावीर आणि मालिकावीर घोषित करण्यात आले.