टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हन संघाविरुद्ध चार दिवसांचा सराव सामना खेळत आहे. या सामन्यात भारताने पहिल्या डावात सर्वबाद ३५८ धावा केल्या. त्यात भारताकडून पाच फलंदाजांनी अर्धशतके ठोकली. त्यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत प्रतिस्पर्धी संघाने बिनबाद २४ धावा केल्या आहेत. पण या सामन्याच्या सुरुवातीआधीच एक मजेशीर घटना घडली आणि नेटिझन्सच्या विचारांना खाद्य मिळाले.

चार दिवसांचा हा सराव सामना बुधवारपासून सुरू होणे अपेक्षित होते, परंतु पहिला दिवस पावसाने वाया घालवला. पहिल्या दिवशी नाणेफेकही होऊ शकली नाही. त्यामुळे गुरुवारी दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेक करायला मैदानावर आले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पाहुण्यांना प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहली हा चक्क अर्धी चड्डी घालून नाणेफेकीसाठी मैदानात आला.

त्याच्या या वागण्यामुळे चर्चांना उधाण आले. भारतीय संघाने सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ३५८ धावा केल्या. पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, कर्णधार विराट कोहली आणि हनुमा विहारी यांनी अर्धशतक झळकावत कसोटी संघासाठी दावेदारी सांगितली. त्यांच्या खेळीचे कौतुक होत आहेच, परंतु सोशल मीडियावर सध्या कोहलीने केलेल्या त्या कृत्याची चर्चा रंगली आहे. कोहली नाणेफेकीसाठी चक्क अर्ध्या चड्डीवर आल्यामुळे सोशल मीडियावर त्याची चांगलीच खिल्ली उडवण्यात आली.

—-


—-


—-


—-

====