नव्याने उभारण्यात आलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या पहिल्या वहिल्या कसोटी सामन्यामध्ये खेळपट्टीने आपली कमाल दाखवत भारत आणि इंग्लंडमधला तिसरा कसोटी सामना अवघ्या २ दिवसांत संपवला. या खेळपट्टीवर मोठ्या प्रमाणावर टीका देखील झाली. मात्र, आता चौथ्या कसोटी सामन्यामध्ये देखील तोच कित्ता गिरवला जातोय की काय, असं वाटू लागलं असतानाच रिषभ पंत टीम इंडियाच्या मदतीला धावून आला. अवघ्या ११७ चेंडूंमध्ये २ षटकार आणि १३ चौकारांच्या मदतीने दमदार शतक ठोकत रिषभ पंतनं भारताच्या डावाला आकार दिला. निम्मा संघ तंबूत परतल्यानंतर देखील रिषभ पंतनं एका बाजूने तंबू ठोकून धावा जमवायला सुरुवात केली. धिम्या गतीने खेळत अर्धशकत पूर्ण करणाऱ्या रिषभ पंतनं पुढच्या ५० धावा वेगाने पूर्ण केल्या. मात्र, अँडरसनच्या उसळत्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात रिषभ पंत झेलबाद झाला.

रिषभ पंत बाद झाल्यानंतर टीम इंडिया फार लांब जाऊ शकणार नाही असं वाटत असताना वॉशिंग्टन सुंदरनं अक्षर पटेलला हाताशी धरून धावफलक हलता ठेवला. ११७ चेंडूंमध्ये वॉशिंग्टन सुंदरने आपलं अर्धशतक देखील पूर्ण केलं. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा भारतानं ७ बाद २९४ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे भारताकडे ८९ धावांची आघाडी आली आहे. वॉशिंग्टन सुंदर नाबाद ६० तर अक्षर पटेल नाबाद ११ धावांवर खेळत आहेत.

पहिल्या दिवसात पाहुण्यांचा आख्खा संघ अवघ्या २०० धावांवर गारद झाल्यानंतर मैदानात आलेल्या टीम इंडियाचीही भोपळाही न फोडता पहिली विकेट पडली आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या छातीत धस्स झालं! शुक्रवारी दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा खेळ संपेपर्यंत ती काळजी काही खोटी नव्हती हेच स्पष्ट झालं. संघाच्या फक्त ८० धावा फलकावर लागलेल्या असताना भारताची वरची फळी तंबूत परतली देखील!

गुरुवारी पहिल्या दिवशी साहेबांचा आख्खा संघ तंबूत धाडल्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांवर कौतुकाचा वर्षाव होत होता. अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज या त्रिकुटानं इंग्लंडची फलंदाजी अक्षरश: कापून काढली. त्यामुळे आता टीम इंडिया या सामन्यावर पहिल्या इनिंगमध्येच वर्चस्व गाजवणार असं वाटत असतानाच पहिल्या ओव्हरच्या तिसऱ्याच बॉलवर अँडरसननं सलामीवीर शुबमन गिलला पायचीत करून भारताला पहिला धक्का दिला. एकही रन न करता शुभमन गिल माघारी परतल्यामुळे पुढे आलेल्या चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मावर दडपण येणं साहजिकच होतं.

पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या एका गडी बाद २४ धावा झाल्या होत्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा टीम इंडिया धिम्या गतीने का होईना पण डावाला आकार देईल असं वाटत होतं. पुजारा आणि रोहित शर्मा यांनी सुरुवातीला संथ पण आश्वासक सुरुवात देखील केली. पण कालच्या धावसंख्येमध्ये फक्त १६ धावांची भर घालून पुजारा वैयक्तिक १७ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ कर्णधार विराट कोहली भोपळाही न फोडता माघारी परतला.

भरवशाच्या अजिंक्य रहाणेला साथीला घेऊन रोहित शर्माने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण २७ धावांवर अजिंक्य रहाणे देखील अँडरसनची शिकार ठरला आणि पहिल्या सत्राचा खेळ संपला! त्यानंतर आलेल्या रिषभ पंतला साथीला घेऊन एक बाजू लावून धरणाऱ्या रोहित शर्माने डावाला आकार दिला. ही जोडी स्थिरावत असल्याचं वाटत असतानाच रोहित शर्मा वैयक्तिक ४९ धावसंख्येवर असताना बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर पायचीत झाला.