इंग्लंडविरूद्ध पाचव्या कसोटीत आज तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. भारताने दुसऱ्या दिवसअखेर ६ बाद १७४ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे भारताला दुसऱ्या दिवसअखेर १५८ धावांनी पिछाडीवर रहावे लागले होते. पण आता भारताची मदार आता तळाच्या फलंदाजांवर आहे.

इंग्लंडचा पहिला डाव ३३२ धावांवर आटोपला. पहिल्या दिवसअखेर ७ बाद १९८ अशी अवस्था असलेल्या इंग्लंडला जोस बटलरने शेपटाच्या फलंदाजांना हाताशी घेत त्रिशतकी मजल मारून दिली. भारतीय गोलंदाजांचा इंग्लंडने चांगलाच समाचार घेतला. पण याबाबत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने संघनिवडीवर नाराजी व्यक्त केली आहे.

बुमराहला गोलंदाजीत अपयशाबाबत विचारण्यात आले. आम्ही चारच गोलंदाज संघात घेऊन खेळत असल्याने आमची गोलंदाजी निष्प्रभ ठरली, असे स्पष्टीकरण त्याने दिले.

जेव्हा तुमच्या संघात एक अतिरिक्त गोलंदाज असतो, तेव्हा नेहमीच्या गोलंदाजांना काही काळ विश्रांती मिळते. पण आमच्या संघात चार गोलंदाज होते. त्यामुळे आम्हाला थोड्या-थोड्या वेळाने पुन्हा गोलंदाजी करण्यास यावे लागत होते. त्यामुळे आमच्या गोलंदाजीची धार कमी झाली असे म्हणता येईल, असे तो म्हणाला.

गोलंदाजी करताना आम्हाला ही एक कमतरता जाणवली. या व्यतिरिक्त बोलायचे तर आम्ही चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. आम्ही भरपूर षटके फेकली. पण एक अतिरिक्त गोलंदाज असता तर आम्हाला आणखी चांगली कामगिरी करता आली असती, असे त्याने नमूद केले.