Ind vs Eng : भारतीय संघाचा दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडकडून अत्यंत लाजिरवाणा पराभव झाला. या विजयामुळे इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. पहिल्या सामन्यात भारताने टक्कर देण्याचा प्रयत्न केला होता. पण दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी हत्यार टाकून दिली असल्याचे दिसून आले. तसेच गोलंदाजांनीही फारसा प्रभाव पाडला नाही.

त्यामुळे दुसऱ्या कसोटीतील पराभवाचे खापर भारतीय चाहत्यांनी संघ निवडीच्या निर्णयावर आणि पर्यायाने कर्णधार विराट कोहलीवर फोडले. कर्णधार कोहलीने पहिल्या सामन्यात झुंजार खेळ केला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात त्याच्याकडून चांगला खेळ होऊ शकला नाही, त्यामुळे कोहलीवर अनेकांनी टीका केली. त्याचे कर्णधारपद कदाचित काढून घेतले जाऊ शकेल, अशी चर्चाही क्रिकेटवर्तुळात रंगली. या पार्श्वर्भूमीवर आता विराटने आपल्या चाहत्यांना भावनिक साद घातली आहे.

विराटने आपल्या फेसबुक पेजवरून एक फोटो आणि संदेश पोस्ट केला आहे. या संदेशात त्याने स्पष्टपणे लिहिले आहे की आम्ही काही वेळा जिंकतो, तर काही वेळा पराभूत होतो. पण जेव्हा आम्ही पराभूत होतो, तेव्हा आम्ही त्यातून खूप काही शिकतो. त्यामुळे चाहत्यांनो, तुम्ही आमची साथ सोडू नका, अशी भावनिक साद विराटने घातली आहे.

आम्ही चांगली कामगिरी करू असा विश्वास आहे. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. आमची साथ कधीही सोडू नका आणि आम्हीही तुमची साथ कधी सोडणार नाही, असेही त्याने नमूद केले आहे. पहिल्या सामन्यात त्याने १४९ आणि ५१ धावा केल्या. पण दुसऱ्या सामन्यात त्याला आपली लय कायम राखता आली नाही. यावरूनही त्याच्यावर टीका झाली.