विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात विजयाची नोंद केली. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं २०४ धावांचं आव्हान भारतीय संघाने ६ गडी राखत पूर्ण केलं. सलामीवीर लोकेश राहुल, मुंबईकर श्रेयस अय्यर आणि कर्णधार विराट कोहली यांच्या आक्रमक खेळाच्या जोरावर भारतीय संघाने विजय मिळवत मालिकेत १-० ने आघाडी घेतली.

सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतल्यानंतर, लोकेश राहुलने कर्णधार विराट कोहलीसोबत महत्वपूर्ण भागीदारी रचत भारताचा डाव सावरला. राहुलने २७ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने ५६ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २०० पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करताना लोकेश राहुलची कामगिरी ही वाखणण्याजोगी राहिलेली आहे. गेल्या काही सामन्यांमधली आकडेवारी ही त्याच्या या खेळाची साक्ष ठरलेली आहे.

दरम्यान, ५६ धावांवर राहुल इश सोधीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहलीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र मोक्याच्या षटकांमध्ये विराट माघारी परतला. यानंतर श्रेयस अय्यर आणि मनिष पांडे यांनी अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला.

अवश्य वाचा – Video : मुंबईकर हिटमॅनची ‘तारेवर कसरत’