कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सलामीचे सातही सामने जिंकत, अव्वल स्थान पटकावलेल्या भारतीय संघाला अखेरीस पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. वेलिंग्टन कसोटीत न्यूझीलंडने भारतावर १० गडी राखत मात करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली. भारतीय फलंदाजांनी या सामन्यात दोन्ही डावांमध्ये पुरती निराशा केली. दुसऱ्या डावात भारतीय संघावर डावाने पराभव स्विकारण्याची नामुष्की आली होती, मात्र ऋषभ पंत आणि इशांत शर्माने ही नामुष्की टाळली.

अवश्य वाचा – Ind vs NZ : वेलिंग्टन कसोटीत न्यूझीलंडकडून भारताचा धुव्वा, १० गडी राखत जिंकला सामना

सामना संपल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने भारताच्या पराभवाचं कारण सांगितलं. “नाणेफेक हा सगळ्यात मोठा मुद्दा होता, ज्याचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला. आतापर्यंत आमची फलंदाजी कोणत्याही मैदानावर चांगली होईल असा आम्हाला विश्वास होता, मात्र या सामन्यात असं काहीच झालं नाही. २२०-२३० ची धावसंख्या या मैदानावर पुरेशी होती, मात्र पहिल्या डावातील फलंदाजीमुळे आम्ही बॅकफूटला गेला. यातच न्यूझीलंडने आघाडी घेतल्यामुळे आमच्यावर दबाव आला.”

अवश्य वाचा – Ind vs NZ : वेलिंग्टन कसोटीत टीम साऊदीचं त्रिशतक

यावेळी विराटने भारतीय गोलंदाजांचं मात्र कौतुक केलं. “गोलंदाजांनी आश्वासक कामगिरी केली. पहिल्या डावात न्यूझीलंडचे सात फलंदाज माघारी परतेपर्यंत आम्ही चांगला मारा करत होतो. आम्हाला न्यूझीलंडला १०० धावांपेक्षा जास्त मोठी आघाडी घेऊ द्यायची नव्हती. मात्र तळातल्या फलंदाजांनी केलेली फटकेबाजी आम्हाला महागात पडली. आमचे गोलंदाज स्वतःच्या कामगिरीवर फारसे खुश नसले तरीही मला त्यांनी केलेल्या कामगिरीचा अभिमान आहे.” दरम्यान या मालिकेतला दुसरा सामना २९ फेब्रुवारीपासून ख्राईस्टचर्चच्या मैदानावर खेळवला जाईल.

अवश्य वाचा – Ind vs NZ : भारताची डोकेदुखी ठरलेल्या जेमिसनचा फलंदाजीतला हा विक्रम माहिती आहे का??