विशाखापट्टणम आणि पुणे कसोटी सामन्यात दिमाखदार कामगिरी करुन विजयी आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाची अखेरच्या कसोटी सामन्यात खराब सुरुवात झाली. नाणेफेक जिंकत कर्णधार विराट कोहलीने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारताचे ३ फलंदाज झटपट माघारी परतले. यानंतर अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा या मुंबईकर जोडीने चौथ्या विकेटसाठी अभेद्य द्विशतकी भागीदारी रचत भारताला दमदार पुनरागमन करुन दिलं.

या द्विशतकी भागीदारीदरम्यान रहाणे आणि रोहित शर्मा या दोन्ही खेळाडूंनी आपली शतकं झळकावली. यादरम्यान अजिंक्य रहाणे कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या विकेटसाठी सर्वाधिक वेळा २०० किंवा त्यापेक्षा जास्त धावांची भागीदारी करणारा फलंदाज ठरला आहे. अजिंक्यने माजी खेळाडू सचिन तेंडुलकरच्या कामगिरीशी बरोबरी केली आहे. याचसोबत अजिंक्यने गांगुली-कोहली आणि लक्ष्मण या त्रिकुटाला मागे टाललं आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये अजिंक्य रहाणेचं हे अकरावं शतक ठरलं. तब्बल ३ वर्ष आणि १६ कसोटी सामन्यांनंतर अजिंक्य रहाणेने घरच्या मैदानावर खेळताना शतक झळकावलं आहे. भारतीय मैदानावरचं अजिंक्यचं हे चौथ शतक ठरलंय.

अवश्य वाचा – Ind vs SA : अजिंक्य रहाणेचं शतक, गांगुली-लक्ष्मणला टाकलं मागे