पहिल्या डावात श्रीलंकेला १८३ धावांत गारद केल्यानंतर भारतीय संघाने दमदार फलंदाजी करीत सर्वबाद ३७५ धावा केल्या आहेत. त्यामुळे भारताने श्रीलंकेवर १९२ धावांची आघाडी घेतली. तसेच दुसऱया डावात देखील भारतीय गोलंदाजांनी लंकेच्या पहिल्या दोन फलंदाजांना भोपळाही न फोडू देता माघारी धाडले. अश्विनने करुणारत्ने याला, तर अमित मिश्राने सिल्वा याला बाद करून दुसऱया दिवसाचा शेवट गोड केला. दुसऱया दिवसाचा खेळ संपला तेव्हा २ बाद ५ अशी केविलवाणी अवस्था श्रीलंकेची झाली आहे.
दरम्यान, दुसऱया दिवसाच्या सुरूवातीला भारताचा सलामीवर शिखर धवन आणि कर्णधार कोहलीने आपली शतके गाठली. कोहलीने १०३ तर धवनने १३४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. कोहलीनंतर फलंदाजीस आलेला अजिंक्य रहाणे आल्या पावलांनीच स्वस्तात बाद होऊन माघारी परतला. रहाणेला कौशलने पायचीत बाद केले. धवन आणि कोहलीच्या द्विशतकी भागीदारीमुळे भारतीय संघाने यजमानांवर आघाडी घेता आली. धवनने मैदानात चांगला जम बसवूवन युवा खेळाडू वृद्धीमान सहाच्या साथीने भारतीय धावसंख्येला आकार दिला.
कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी आपली चमक दाखवून श्रीलंकेच्या संघाला १८४ धावांत गारद केले होते. त्यानंतर फलंदाजी करताना भारतीय संघाने लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांना स्वस्तात गमावले होते. पहिल्या दोन विकेट्स पडल्यानंतर शिखरने संयमी फलंदाजी करीत मैदानात जम बसवला आणि कोहलीने देखील त्याला साजेशी साथ दिली. दुसऱया दिवसाच्या सुरूवातीला श्रीलंकेच्या गोलंदाजांना पुनरागमनाची संधी न देता शिखरने आपल्या खेळीतील सातत्य कायम राखत शतकाच्या दिशेने कूच केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 13, 2015 11:54 am