पहिल्या सामन्यात बाजी मारल्यानंतर, तिरुअनंतपुरमच्या मैदानावर विंडीजच्या संघाने धडाकेबाज फलंदाजी करत मालिकेत बरोबरी साधली. लेंडन सिमन्स, एविन लुईस, शेमरॉन हेटमायर आणि निकोलस पूरन या फलंदाजांनी दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय गोलंदाजांची पिसं काढली. विजयासाठी दिलेलं १७१ धावांचं आव्हान विंडीजच्या फलंदाजांनी केवळ २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही भारतीय गोलंदाजांची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. क्षेत्ररक्षणातही भारतीय खेळाडूंनी ढिसाळ कामगिरी करत विंडीजच्या संघाला धावा बहाल केल्या. वॉशिंग्टन सुंदर, रविंद्र जाडेजा, श्रेयस अय्यर यांची क्षेत्ररक्षणातली कामगिरी फारच निराशाजनक होती. मात्र या सर्वांमध्ये विराट कोहलीने आपल्या शाररिक तंदुरुस्तीचं प्रदर्शन करत, सीमारेषेवर भन्नाट झेल पकडला.

सामन्यात १४ व्या षटकात जाडेजाच्या गोलंदाजीवर हेटमायरने षटकार खेचण्याचा प्रयत्न केला. चेंडू सीमारेषेच्या पल्याड जायच्या आत विराट कोहलीने पूर्णपणे स्वतःला झोकून देत झेल पकडत हेटमायरला माघारी धाडलं. पाहा हा धक्कादायक व्हिडीओ….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामना संपल्यानंतर आपण घेतलेल्या कॅचबद्दल विचारलं असताना विराट म्हणाला, “चेंडू सुदैवाने माझ्या हातात येऊन बसला. आधीच्या सामन्यात अशाच प्रकारे मी एक झेल सोडला होता. त्यामुळे या सामन्यात मी १०० टक्के प्रयत्न करत दोन्ही हात झोकून दिले आणि तो चेंडू माझ्या हातात येऊन बसला”. दरम्यान ३ सामन्यांच्या मालिकेत सध्या दोन्ही संघांनी १-१ अशी बरोबरी साधली आहे. अखेरचा सामना ११ तारखेला मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला जाईल. त्यामुळे या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.