मयांक अगरवालची तुफानी खेळी
भारतीय ‘अ’ संघ मंगळवारी पाहुण्या संघांविरुद्ध ‘अ’ग्रेसर ठरला. भारताच्या दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघावर भारतीय ‘अ’ संघाने ट्वेन्टी-२० सराव सामन्यामध्ये आठ विकेट्सने दणदणीत विजय मिळवत त्यांचा चांगलाच पाहुणचार केला, तर बांगलादेश ‘अ’ विरुद्धच्या तीन दिवसीय कसोटी सामन्यात भारतीय ‘अ’ संघाने एका डावाने विजय मिळवला. भारतीय ‘अ’ संघाच्या खेळाडूंनी या दोन्ही सामन्यांमध्ये आपली हुशारी दाखवून दिली.

बलाढय़ दक्षिण आफ्रिकेच्या संघाला भारतीय मातीत पहिल्याच सामन्यात पराभवाची नामुष्की ओढवली. मयांक अगरवालच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर भारतीय ‘अ’ संघाने दक्षिण आफ्रिकन्स संघाचा आठ बळी राखून सहज विजय मिळवला.
नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारलेल्या दक्षिण आफ्रिकन्स संघाला धावफलकावर तीन धावा असतानाच पहिला धक्का बसला. पण त्यानंतर मात्र आफ्रिकेच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजीचा नमुना पेश करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. जे पी डय़ुमिनीने फक्त ३२ चेंडूंमध्ये २ चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर नाबाद ६८ धावांची तडफदार खेळी साकारत संघाला १८९ धावांचा पल्ला गाठून दिला.
दक्षिण आफ्रिकन्स संघाच्या धावसंख्येचा पाठलाग करताना मनन व्होरा आणि मयांक यांनी ११९ धावांची सलामी देत भारताच्या विजयाचा पाया भक्कम बनवला. व्होराने या वेळी ८ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५६ धावा केल्या, तर मयांकने स्फोटक खेळी साकारताना ४९ चेंडूंमध्ये १२ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ८७ धावांची खेळी साकारत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. हे दोघेही बाद झाल्यावर संजू सॅमसन (नाबाद ३१) आणि मनदीप सिंग (नाबाद १२)
यांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिकन्स : २० षटकांत ३ बाद १८९ (जे पी डय़ुमिनी नाबाद ६८, फॅफ डय़ू प्लेसिस ४२; हार्दिक पंडय़ा १/१६) पराभूत वि. भारत ‘अ’ : १९.४ षटकांत २ बाद १९३ (मयांक अगरवाल ८७, मनन व्होरा ५६; जे पी डय़ुमिनी १/२२).

संघातील गोलंदाजांच्या क्षमतेवर माझा पूर्णपणे विश्वास असून मी त्यांच्या पाठीशी कायम राहीन. मला पूर्ण विश्वास आहे की ते भारतीय संघाला थोपवतील. आजचा दिवस आम्हाला लयीत येण्यासाठी आणि वातावरणाशी जुळवून येण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. या सामन्याचा आम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल.
– जे पी डय़ुमिनी, दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू

माझ्यासाठी जी संधी मिळेल त्याचा फायदा उचलत चांगली कामगिरी करणे गरजेचे असून या साऱ्या प्रक्रियेवर माझे लक्ष केंद्रित आहे. ही खेळपट्टी संथ असली तरी आफ्रिकेची गोलंदाजी अचूक होती. माझे काम हे फक्त चांगली कामगिरी करणे असून निवड करण्याचा अधिकार माझ्याकडे नाही.
– मयांक अगरवाल, भारत ‘अ’ संघाचा फलंदाज