चेक प्रजासत्ताकचा पूर्ण क्षमतेचा संघ भारतात होणाऱ्या डेव्हिस चषक लढतीत खेळणार आहे. त्यामुळे या सामन्यात विजयासाठी भारतीय संघाला चमत्कार घडवावा लागेल, असे मत भारताचा अव्वल दुहेरी टेनिसपटू महेश भूपतीने व्यक्त केले.
जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेला टॉमस बर्डीच आणि दुहेरी प्रकारात अनेक ग्रँड स्लॅम जेतेपदे नावावर असणारा राडेक स्टेपानेक यांनी चेक प्रजासत्ताकच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीतून माघार घेतली होती. मात्र भारताविरुद्ध हे दोघेही खेळणार आहेत. चेक प्रजासत्ताकने १९८०, २०१२ आणि २०१३ मध्ये डेव्हिस चषकाचे जेतेपद पटकावले होते. मात्र अद्यापही त्यांनी आपल्या संघाची घोषणा केलेली नाही.
‘‘चेकसारख्या अव्वल संघाविरुद्ध घरच्या परिस्थितीत खेळण्याचा फायदा वगैरे मुद्दे गौण ठरतात. तंदुरुस्ती आणि चिवटपणा या गुणवैशिष्टय़ांसाठी चेकचे खेळाडू ओळखले जातात. गेल्या चार वर्षांत त्यांनी दोन वेळा डेव्हिस चषकावर कब्जा केला आहे. बर्डीच आणि स्टेपानेक सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखदार प्रदर्शन करत आहेत. त्यामुळे अशा संघाविरुद्ध जिंकण्यासाठी चमत्काराची गरज आहे,’’ असे भूपती याने सांगितले.
भारतीय संघाविषयी विचारले असता भूपती म्हणाला, ‘‘सर्वोत्तम खेळ करत झुंज देण्याची क्षमता भारतीय संघात आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत भारतीय संघाने विजय मिळवला होता.’’