सुल्तान अझलन शाह चषक हॉकी स्पध्रेची अंतिम फेरी गाठण्याचे भारताचे स्वप्न तिसऱ्या पराभवामुळे धुळीस मिळाले. राऊंड-रॉबिन लीगमधील न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ०-२ अशा फरकाने पराभूत झाल्यामुळे एक लढत शिल्लक असतानाच भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.
पाच वेळा अझल शाह चषक जिंकणाऱ्या भारताला स्पध्रेतील आव्हान टिकविण्यासाठी ही लढत जिंकणे आवश्यक होते. परंतु न्यूझीलंडने दुसऱ्या सत्रात दोन गोल झळकावून आपला झेंडा डौलाने फडकवत ठेवला. ४०व्या मिनिटाला न्यूझीलंडच्या अँडी हेवर्डने दुसऱ्या पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर ५५व्या मिनिटाला कोरी बेनेटने न्यूझीलंडच्या खात्यावर दुसरा गोल नोंदवला.
सकाळच्या सत्रात कोरियाला ३-३ असे बरोबरीत रोखल्यानंतरही सहा वेळा विजेत्या ऑस्ट्रेलियाने गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान ८ गुणांसह अबाधित राखले आहे. त्यानंतर मलेशिया (७ गुण) आणि न्यूझीलंड (६ गुण) अंतिम फेरीच्या शर्यतीत आहेत. कोरियाने चार सामन्यांत ४ गुण जमा केले आहेत.
भारताचे मुख्य प्रशिक्षक मायकेल नॉब्स म्हणाले की, ‘‘आम्ही क्षमतेपेक्षा वाईट खेळ केला. अनेक पेनल्टी कॉर्नर्सचे गोलमध्ये रूपांतर करण्यात आम्ही अपयशी ठरला. पाकिस्तानविरुद्ध आम्ही ज्या पद्धतीने आम्ही खेळलो, त्याच्या ५० टक्केसुद्धा खेळ आमचा झाला नाही.’’