निर्भेळ यशासाठी ऑस्ट्रेलिया प्रयत्नशील; पाचवा एकदिवसीय सामना आज

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताला अजूनही विजयाची चव चाखायला मिळालेली नाही. एकदिवसीय मालिकेत सलग चार पराभव त्यांच्या पदरी पडले आहेत. त्यामुळे आता मालिका जरी गमावली असली तरी भारताने मालिकेचा शेवट तरी गोड करावा, अशी अपेक्षा त्यांच्या चाहत्यांकडून व्यक्त होत आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने मालिकेत ४-० अशी विजयी आघाडी घेतली असून भारतावर निर्भेळ यश मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील असतील. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना शनिवारी होणार असून हा सामना नेमका कोण जिंकेल, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

भारताने या मालिकेतील चारही सामन्यांमध्ये तीनशे धावा केल्या आहेत, पण त्यांना एकही विजय मिळवता आलेला नाही. सलामीवीर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी या मालिकेत आतापर्यंत प्रत्येकी दोन शतके झळकावली आहेत. गेल्या सामन्यात शतक झळकावून सलामीवीर शिखर धवनने आपण फॉर्मात आल्याचे दाखवून दिले आहे. अजिंक्य रहाणेने या मालिकेत उपयुक्त खेळी साकारली असली तरी तो दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकणार नाही. या चौघांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला लय सापडलेली दिसत नाही. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने सलग दोन एकदिवसीय मालिका गमावल्या आहेत. दुसरीकडे त्यालाही आतापर्यंत लौकिकाला साजेशी फलंदाजी करता आलेली नाही. त्याचबरोबर संघातील अष्टपैलू रवींद्र जडेजालाही फलंदाजीत छाप पाडता आलेली नाही. युवा खेळाडूंना या मालिकेत संधी देण्यात आली असली तरी त्यांना अजूनही चमकदार कामगिरी करता आलेली नाही. धोनीने या खेळाडूंना धाडसी होण्याचा सल्ला दिला असला तरी त्यांच्याकडून प्रत्येक वेळी निराशाच पदरी पडली आहे.

भारताची गोलंदाजी या मालिकेत स्वैर आणि बोथट पाहायला मिळाली आहे. चारपैकी एकाही सामन्यात गोलंदाजांकडून विजयासाठी प्रयत्न झाल्याचे पाहायला मिळाले नाहीत. या सामन्यात जर त्यांच्याकडून अपेक्षित साथ मिळाली तर भारत विजयासमीप पोहोचू शकतो.

ऑस्ट्रेलियाने या मालिकेत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. कर्णधार स्टिव्हन स्मिथ, जॉर्ज बेली, डेव्हिड वॉर्नर, आरोन फिन्च यांनी चांगली फलंदाजी केली आहे. गोलंदाजीमध्ये केन रिचर्डसन, जेम्स फॉकनर, नॅथन लिऑन यांच्याकडून भेदक मारा पाहायला मिळाला आहे.

दोन्ही संघांचा विचार केला तर सध्याच्या घडीला भारतापेक्षा ऑस्ट्रेलियाचे पारडे जड आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये त्यांनी मायदेशात २९ सामने जिंकले असून फक्त दोन सामने गमावले आहेत. भारताच्या संघात कधीही पुनरागमन करण्याची धमक आहे. मालिका गमावली असली तरी शेवटचा सामना जिंकून ट्वेन्टी-२० मालिकेसाठी मनोबल उंचावण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

संघ

ऑस्ट्रेलिया : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, आरोन फिन्च, जॉर्ज बेली, जॉन हॅस्टिंग्ज, ग्लेन मॅक्सवेल, जेम्स फॉकनर, मॅथ्यू वेड (यष्टिरक्षक), जोएल पॅरिस, स्कॉट बोलँड, शॉन मार्श, केन रिचर्डसन, मिचेल मार्श.

भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/ यष्टिरक्षक), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, गुरकीरत मान, रिशी धवन, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, उमेश यादव, बरिंदर सरण.

सामन्याची वेळ : सकाळी ८.५० वाजल्यापासून.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, ३ आणि एचडी १, ३.

मालिकेत निर्भेळ यश मिळवणे, हे आमचे ध्येय आहे. आतापर्यंत आम्ही चांगले एकदिवसीय क्रिकेट खेळलो आहोत. त्यानुसार या मालिकेचा ५-० असा शेवट व्हावा, यासाठी आम्ही सज्ज आहोत.  भारतासाठी हा सामना नक्कीच सोपा नसेल.

स्टीव्हन स्मिथ, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार

आमचे मानसिक खच्चीकरण झालेले नाही, जर तसे झाले असते तर आम्ही स्पर्धाच खेळलो नसतो.  जर निकाल काहीही वेगळाच लागला तर तो वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो. निकाल काहीही लागला तरी आपण त्याचा आदर करायला हवा.

विराट कोहली, भारताचा फलंदाज

कोहलीलाच तिन्ही संघांचा कर्णधार करा – प्रसन्ना

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाची जादू लोप पावत चालली आहे. त्यामुळे विराट कोहलीलाच भारताच्या तिन्ही संघांचा कर्णधार बनवावे , असे मत भारताचे माजी महान फिरकीपटू इरापल्ली प्रसन्ना यांनी व्यक्त केले आहे. ‘‘कोहलीला भारताच्या तिन्ही संघांचा कर्णधार बनवण्याची हीच योग्य वेळ आहे. पण धोनीच्या अनुभवाचा संघाला फायदाही होईल,’’ असे प्रसन्ना यांनी सांगितले.