आज पहिला ट्वेन्टी-२० सामना

महिन्याभराच्या विश्रांतीनंतर ताजातवाना झालेला भारतीय संघ पुन्हा क्रिकेटच्या रणांगणावर परतणार आहे. दक्षिण आफ्रिकेसारखा बलाढय़ संघ अडीच महिन्यांच्या प्रदीर्घ दौऱ्यासाठी भारतात दाखल झाला आहे. शुक्रवारी होणारा पहिला ट्वेन्टी-२० सामना जिंकून विजयी प्रारंभ करण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे.

हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या (एचपीसीए) स्टेडियमवरील थंडगार वातावरण वेगवान गोलंदाजांसाठी पर्वणी ठरणारे असल्यामुळे स्वाभाविकपणे पाहुणा संघ खुशीत आहे. दिल्लीत झालेल्या ट्वेन्टी-२० सराव सामन्यात भारत ‘अ’ संघाविरुद्ध पराभूत झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ खडाडून जागा झाला आहे. भारतीय ‘अ’ संघात एकही नियमित आंतरराष्ट्रीय खेळाडू नव्हता; परंतु तरीही पालमवरील सामन्यात १९० धावांचे लक्ष्य या संघाने आरामात पेलले.

कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणारा धोनी तीन महिन्यांनंतर भारतीय संघाचे नेतृत्व करीत आहे. भारतात पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने या मालिकेकडे पाहिले जात आहे. त्यामुळे श्रीनाथ अरविंदसारख्या नवख्या खेळाडूंना अजमावण्याची संधी या मालिकेत असेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेव्यतिरिक्त विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पध्रेअगोदर भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध चार सामने आणि आशिया चषक स्पर्धा खेळणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत प्रामुख्याने फलंदाजांचा संघर्ष पाहायला मिळेल. आफ्रिकेच्या संघात घणाघाती फलंदाजी करणारा कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिस आणि धडाकेबाज फलंदाज ए बी डी’व्हिलियर्सचा समावेश आहे. जगातील कोणत्याही आक्रमणाचा ताकदीने प्रतिकार करण्याची क्षमता या फलंदाजांमध्ये आहे.

जबाबदारीने फलंदाजी करणारा हशिम अमला, स्फोटक फलंदाज डेव्हिड मिलर, जीन-पॉल डय़ुमिनी यांच्यासारख्या खेळाडूंमुळे दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी अधिक सक्षम आहे. याशिवाय आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव गाठीशी असल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ कडवी लढत देईल. डय़ू प्लेसिस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचेच प्रतिनिधित्व करतो.

मायकेल हसीसारखा मार्गदर्शक सोबत असणे, हे आफ्रिकेचे आणखी एक बलस्थान आहे. माजी ऑस्ट्रेलियन फलंदाज हसी भारताविरुद्ध आणि आयपीएलमध्ये धोनीसोबत अनेक सामने खेळला आहे. त्याचे कानमंत्र दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

भारताची मदार प्रामुख्याने फलंदाजांवर आहे. दुखापतीतून सावरलेला डावखुरा फलंदाज शिखर धवनने बांगलादेश ‘अ’ संघाविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी साकारली होती; परंतु शिखरसोबत सलामीला रोहित शर्मा किंवा अजिंक्य रहाणे यापैकी कोण उतरणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मधल्या फळीत कसोटी कर्णधार विराट कोहली, सुरेश रैना आणि धोनी यांचा समावेश आहे. अधिक मोकळेपणाने फलंदाजी करता यावी, यासाठी धोनी वरच्या क्रमांकावर उतरल्यास आश्चर्य वाटू नये.

अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची असेल. रविचंद्रन अश्विन आता भारताच्या फिरकीची धुरा समर्थपणे सांभाळत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत त्याने मालिकावीर पुरस्कारालाही गवसणी घातली होती. या परिस्थितीत अंतिम भारतीय संघात स्थान मिळवणे, हे हरभजनसाठी आव्हानात्मक ठरू शकेल.

एचपीसीए स्टेडियमची खेळपट्टी जरी वेगवान गोलंदाजांना अनुकूल ठरणारी असली तरी धोनी दोन फिरकी गोलंदाजांसह खेळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अश्विनसह अमित मिश्रा आणि अक्षर पटेल यांचे पर्याय उपलब्ध असताना हरभजनला संघात स्थान मिळणे कठीण आहे.

वेगवान मारा ही भारतासाठी चिंतेची बाब ठरू शकते. भुवनेश्वर कुमार गेल्या सहा महिन्यांत एकही सामना खेळलेला नाही. मोहित शर्मा आणि अरविंद यांच्यात दुसऱ्या स्थानासाठी स्पर्धा असेल. स्टुअर्ट बिन्नीलाही संघात स्थान मिळवण्यात अडचण येणार नाही.

दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान माऱ्याची धुरा कायले अॅबॉट आणि ख्रिस मॉरिस सांभाळणार आहेत. लेग स्पिनर इम्रान ताहिरकडे सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता आहे. दुखापतग्रस्त डेव्हिड विसीच्या जागी संघात आलेल्या अॅल्बी मॉर्केलकडून मोठय़ा अपेक्षा आहेत.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/यष्टिरक्षक), श्रीकांत अरविंद, रविचंद्रन अश्विन, स्टुअर्ट बिन्नी, शिखर धवन, हरभजन सिंग, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, अक्षर पटेल, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अंबाती रायुडू, मोहित शर्मा, रोहित शर्मा.

दक्षिण आफ्रिका : फॅफ डय़ू प्लेसिस (कर्णधार), कायले अॅबॉट, हशिम अमला, फरहान बेहरादिन, क्विंटन डी कॉक (यष्टिरक्षक), र्मचट डी लँगे, ए बी डी’व्हिलियर्स, जीन-पॉल डय़ुमिनी, इम्रान ताहिर, एडी लीई, डेव्हिड मिलर, अॅल्बी मॉर्केल, ख्रिस मॉरिस, कॅगिसो रबाडा, खाया झोंडो.

सामन्याची वेळ : सायंकाळी ७ वाजल्यापासून.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर.

भारताकडे चार फिरकीपटू आहेत, त्याचबरोबर तीन वेगवान गोलंदाजही आहेत. पण वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू मात्र भारताकडे नाही. त्यामुळे ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये चार षटके आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० षटकांचा कोटा पूर्ण करणारा एकही अष्टपैलू सध्या भारतीय संघात दिसत नाही आणि या गोष्टीच डोक्यामध्ये ठेवून आम्हाला खेळावे लागणार आहे.

– महेंद्रसिंग धोनी, भारताचा कर्णधार