भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतून भारताचा यष्टीरक्षक वृद्धीमान साहा दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. मांडीतल्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे साहा आफ्रिकेविरुद्ध पुढचा कसोटी सामना खेळू शकणार नाहीये. साहाच्या जागेवर दिनेश कार्तिकची संघात निवड करण्यात आलेली आहे.

अवश्य वाचा – विराटच्या आक्रमकतेचा आमच्यावर परिणाम नाही- मोर्केल

आफ्रिकेविरुद्ध केप टाऊन कसोटीत भारताला ७२ धावांनी पराभव पत्करावा लागला. मात्र या सामन्यात यष्टीरक्षक म्हणून साहाची कामगिरी चांगली झाली होती. यष्टींमागे १० झेल पकडत साहाने धोनीचा विक्रमही मोडीत काढला होता. मात्र फलंदाजीत त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. मात्र सेंच्युरिअन कसोटी सुरु होण्याआधी साहाला दुखापतीमुळे संघाबाहेर जावं लागलं. साहाच्या जागी पार्थिव पटेलला संघात संधी देण्यात आली. यानंतर बीसीसीआयने साहाच्या दुखापतीवर प्रसिद्धीपत्रक काढून कार्तिकच्या निवडीची घोषणा केली.

दिनेश कार्तिकने २०१० साली महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली बांगलादेशविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती. यानंतर कार्तिकला भारताच्या एकदिवसीय संघात जागा मिळाली होती, मात्र त्याला कसोटी संघात जागा मिळू शकली नव्हती. त्यामुळे तब्बल ८ वर्षांनी दिनेश कार्तिक भारताच्या कसोटी संघात पुनरागमन करणार आहे. दुसऱ्या कसोटीत पार्थिव पटेलने यष्टीमागे अनेक झेल सोडले होते, त्यामुळे अखेरच्या कसोटीत दिनेश कार्तिकला संघात जागा मिळण्याची शक्यता नाकारण्यात येत नाहीये.

अवश्य वाचा – आयसीसी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी विराट कोहलीला शिक्षा