मेलबर्न येथील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा ८ गड्यांनी पराभव करत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत राहणे भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. सामन्यानंतर बोलताना रहाणेनं भारतीय चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. रहाणेनं रोहित शर्माबाबतची महत्वाची अपडेट दिली आहे.

दुसरा कसोटी सामना संपल्यानंतर चाहत्यांच्या मनात रोहित शर्मा तिसऱ्या सामन्यात खेळणार का? याबाबत उत्सुकता होती. रहाणेनं याबाबत माहिती दिली. रहाणे म्हणाला की, ‘रोहितच्या पुनरागमनाबाबत आम्ही उत्साही आहोत. कालच माझं आणि रोहितच बोलणं झालं, तो संघात परतण्यासाठी वाट पाहतोय.’ असं म्हणतानाच रहाणेनं तिसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा खेळणार असल्याचे संकते दिले आहेत.

आणखी वाचा- अजिंक्य रहाणे चतूर कर्णधार, शास्त्री गुरुजींनी केलं कौतुक

रवी शास्त्री काय म्हणाले?
मुख्य कोच रवी शास्त्री यांनीही रोहित शर्मा तिसऱ्या कसोटीत खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की,  तिसऱ्या कसोटी सामन्यातही पाच गोलंदाजासहच खेळणार आहोत. बुधवारी रोहित शर्मा संघासोबत जोडला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून रोहित क्वारंटाइनमध्ये आहे. संघात स्थान देण्यापूर्वी रोहित शर्मासोबत चर्चा केली जाईल. त्यानंतरच संघाची निवड करण्यात येईल.

दुसरीकडे रोहित शर्मानेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन स्टोरी शेअर करत आपण पुनरागमनासाठी सज्ज असल्याचं संकेत दिले आहेत. सिडनीत क्वारंटाइन असलेला रोहित शर्मा मेलबर्नला आल्यानंतर टीम इंडियाच्या Bio Secure Bubble मध्ये प्रवेश करेल. रोहित शर्माची अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. रोहित शर्मा भारतीय संघात दाखल होण्यासाठी सज्ज झाला असला तरीही तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी त्याला संघात जागा मिळेल की नाही याबाबत अद्याप संभ्रम आहे. रोहित शर्माला संघात स्थान मिळाल्यास मयांक किंवा शुबमन गिल यांच्यापैकी एका खेळाडूला आराम मिळू शकतो.