पहिला डाव २१७ धावांत गडगडला; न्यूझीलंडची २ बाद १०१ अशी मजल

साऊदम्पटन : 

पाऊस आणि अंधुक प्रकाश यांनी दिलासा दिल्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीत रविवारी तिसऱ्या दिवशी कायले जॅमीसनच्या वेगवान माऱ्यापुढे भारतीय फलंदाजांनी हाराकिरी पत्करली, तर न्यूझीलंडच्या फलंदाजीपुढे गोलंदाजांनी निराशा केली.

न्यूझीलंडच्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या माऱ्यापुढे भारताचा पहिला डाव २१७ धावांत संपुष्टात आला. त्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात २ बाद १०१ अशी मजल मारत सामन्यावरील पकड घट्ट केली आहे. इंग्लंडमध्ये सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या डेव्हॉन कॉन्वेच्या (१५३ चेंडूंत १२ चौकारांसह ५४ धावा) अर्धशतकाचा यात समावेश आहे.

सकाळच्या सत्रात खेळपट्टीवर घट्ट पाय रोवणाऱ्या उपकर्णधार अजिंक्य रहाणेला (११७ चेंडू ४९ धावा) अर्धशतकाने हुलकावणी दिली. न्यूझीलंडकडून जॅमीसनने पाचव्यांदा पाच बळी घेण्याची किमया साधली. यात भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या (४४) महत्त्वाच्या बळीचाही समावेश आहे. भारताने ३ बाद १४६ धावसंख्येवरून तिसऱ्या दिवसाच्या खेळाला प्रारंभ केला. पण उपाहारानंतर काही वेळातच ९३व्या षटकात न्यूझीलंडने भारताच्या पहिल्या डावापुढे पूर्णविराम दिला.

सकाळच्या सत्रात विराट आणि रहाणेने डावाला पुढे प्रारंभ केला. पण जॅमीसनने ही जोडी फोडत न्यूझीलंडला दिलासा दिला. विराट-रहाणे यांनी चौथ्या गडय़ासाठी ६१ धावांची भागीदारी केली. मग स्फोटक फलंदाज ऋषभ पंतने (२२ चेंडूंत ४ धावा) निराशा केली. जॅमीसनच्या गोलंदाजीवर लॅथमने स्लिपमध्ये त्याचा अप्रतिम झेल टिपला. त्यानंतर अर्धशतकाच्या उंबरठय़ावरील रहाणे नील व्ॉगनरच्या गोलंदाजीच्या सापळ्यात अडकला आणि पूलचा फटका खेळत स्क्वेअर लेगला टॉम लॅथमकडे झेल देऊन माघारी परतला.

रविचंद्रन अश्विनने कठीण स्थितीत २७ चेंडूंत २२ धावा केल्या. रवींद्र जडेजा (१५) सर्वात शेवटी बाद झाला. त्याने रहाणे आणि अश्विनसह छोटेखानी भागीदारी केल्या. न्यूझीलंडच्या व्ॉगनर आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

त्यानंतर, न्यूझीलंडच्या कॉन्वेने टॉम लॅथमच्या (३०) साथीने ७० धावांची दमदार सलामी दिली. भारताच्या वेगवान त्रिकुटाला यश मिळत नसल्याने १५व्या षटकात विराटने फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनकडे चेंडू दिला. अश्विननेच लॅथमला बाद करीत किवींना पहिला हादरा दिला. विराटने त्याचा सुरेख झेल टिपला. मग दिवसातील अखेरच्या षटकात अनुभवी इशांत शर्माने कॉन्वेला बाद करण्यात यश मिळवले. खेळ थांबला, तेव्हा कर्णधार केन विल्यम्सन १२ धावांवर खेळत होता, तर रॉस टेलरने आपले खाते उघडले नव्हते. भारताकडून इशांत आणि अश्विन यांनी प्रत्येकी एकेक बही मिळवला. आणखी काही षटकांचा खेळ शिल्लक असताना अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला. सोमवारी चौथ्या दिवशी सामन्याच्या निर्णायकतेचे चित्र स्पष्ट होऊ शकेल.

संक्षिप्त धावफलक

’ भारत (पहिला डाव) : ९२.१ षटकांत सर्व बाद २१७ (अजिंक्य रहाणे ४९, विराट कोहली ४४; कायले जॅमीसन ५/३१, नील वॅगनर २/४०)

’ न्यूझीलंड (पहिला डाव) : ४९ षटकांत २ बाद  १०१ (डेव्हॉन कॉन्वे ५४, टॉम लॅथम ३०; इशांत शर्मा १/१९)