भारताची विराटसेना आज इतिहास घडवण्यास सज्ज

गतविजेता भारतीय संघ दोन लढायांच्या आव्हानाचा सामना करीत आहे. एकीकडे प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्या मैदानाबाहेरील वादाकडे संपूर्ण क्रिकेटजगताचे लक्ष लागून राहिले आहे, तर दुसरीकडे आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेत रविवारी परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धचा मैदानावरील सामना आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण सामाजिक-राजकीय संबंधांमुळे या दोन देशांमधील लढतीचे दडपण आणि नाटय़ यांना क्रिकेटच्या व्यासपीठावर अनन्यसाधारण असेच महत्त्व आहे. त्यामुळेच पाकिस्तानला हरवून अब्जावधी भारतीय क्रिकेटरसिकांना सुखद भेट देण्याचा निर्धार भारतीय संघाचा असेल.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळ यांच्यातील वादाचीसुद्धा किनार या सामन्याला आहे. कारण क्रिकेट सामंजस्य कराराचे पालन न केल्याबद्दल पीसीबीने बीसीसीआयला चक्क कायदेशीर नोटीस पाठवली आहे. दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानशी क्रिकेट मालिका न खेळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्याच स्पर्धामध्ये क्रिकेटरसिकांना भारत-पाकिस्तान सामन्याची लज्जत अनुभवता येत आहे.

पाकिस्तानचा मोहम्मद आमिर हा सध्याच्या युगातील सर्वात वेगवान गोलंदाज मानला जातो. त्यामुळेच आक्रमक विराट कोहलीविरुद्धची त्याची मैदानी लढाई चाहत्यांना सचिन तेंडुलकर आणि शोएब अख्तरच्या जुगलबंदीची आठवण करून देईल. भारताची भक्कम फलंदाजीची फळी विरुद्ध पाकिस्तानचा भेदक गोलंदाजीचा मारा यांच्यातील लढाई या सामन्याची रंगत वाढवेल, अशी अपेक्षा आहे.

भारतीय संघात कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यासारखे जगातील कोणत्याही गोलंदाजीचा समर्थपणे सामना करू शकणारे फलंदाज आहेत. परंतु इंग्लिश वातावरणात आमिर, गुणवान जुनैद खान आणि वहाब रियाझ यांचा सामना करणे हे आव्हानात्मक असेल. फलंदाजीला अनुकूल अशा एजबस्टनच्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांची अग्निपरीक्षाच ठरणार आहे.

भारताची गोलंदाजीची फळीसुद्धा तशी समतोल आहे. अष्टपैलू हार्दिक पंडय़ामुळे हा मारा अधिक सशक्त वाटतो. जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांनी आयपीएल हंगामात टिच्चून गोलंदाजी केली. उमेश यादव मागील कसोटी हंगामात यशस्वी ठरला. याचप्रमाणे मोहम्मद शमीकडे प्रतिस्पर्धी संघाच्या सर्वोत्तम फलंदाजाला जेरबंद करण्याच्या वैविध्यपूर्ण क्लृप्त्या आहेत. पाकिस्तानच्या आघाडीच्या फळीत डावखुऱ्या फलंदाजांची उणीव जाणवते. त्यामुळेच रविचंद्रन अश्विनपेक्षा रवींद्र जडेजाच अधिक उपयुक्त ठरू शकेल.

भारत-पाकिस्तान यांच्यातील राजनैतिक संबंध जरी चांगले नसले तरी क्रिकेटपटूंसाठी हा फक्त एक सामना असतो. परंतु क्रिकेटरसिकांना मात्र आपल्या नायकांकडून विजय हवाच असतो. अपेक्षांचे हेच ओझे दोन्ही संघांच्या संघनायकांवर जाणवेल. एक फलंदाज म्हणून विराट पाकिस्तानविरुद्धचा सामना कसा जिंकतात, हे जाणतो. मात्र एक कर्णधार म्हणून रविवारी त्याच्या परिपक्वतेची कसोटी असेल.

आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पध्रेसोबतच कुंबळे-कोहली वाद ऐरणीवर आहे. मात्र सीमारेषा ओलांडून जेव्हा भारतीय खेळाडू मैदानावर उतरतात, तेव्हा हे सारे वाद मातीमोल ठरतात, असा त्यांचा आतापर्यंतचा इतिहास आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा संघ, जो नेहमी कोणत्या ना कोणत्या वादाशी झगडत असतो. खराब तंदुरुस्तीचे कारण देत उमर अकमलला मायदेशी पाठवण्यात आले, हे याचे ताजे उदाहरण ठरेल.

आयसीसीच्या फक्त चॅम्पियन्स करंडक क्रिकेट या एकाच स्पध्रेत पाकिस्तानने भारतावर आघाडी घेतली आहे. आतापर्यंत झालेल्या तीन लढतींपैकी पाकिस्तानने २ आणि भारताने एकमेव लढत जिंकली आहे. इतिहास बाजूला ठेवल्यास कागदावर सर्वच विभागांमध्ये विराटसेना पाकिस्तानी संघापेक्षा सरस आहे.

भारताच्या फलंदाजीच्या फळीत पाकिस्तानपेक्षा अधिक अनुभवी आणि दर्जेदार फलंदाज आहेत. रोहित शर्मा सहा महिन्यांनंतर आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळताना दणक्यात सलामी देण्यासाठी उत्सुक आहे, तर शिखर धवनला २०१३च्या कामगिरीची पुनरावृत्ती करायची आहे. त्या वेळी भारताच्या विजेतेपदात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या धवनला मालिकावीर किताब मिळाला होता. पाकिस्तानच्या सलामीची धुरा अझर अली आणि अहमद शेहझादवर असेल. या दोघांकडे उत्तम गुणवत्ता असली तरी ते भारतीय सलामीवीरांइतके किफायतशीर सिद्ध झालेले नाहीत. रोहित-शिखरची धावांची सरासरी ३८ आहे, तर अझर-अहमदची ३३ आहे.

तिसऱ्या क्रमांकासाठी विराटला आव्हान देणे कठीणच आहे. कारण या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या चार सर्वोत्तम फलंदाजांमध्ये कोहलीसह स्टीव्ह स्मिथ, केन विल्यमसन आणि जो रूटचा समावेश आहे.

बाबर आझमची एकदिवसीय धावसरासरी ४५ इतकी आहे. पाकिस्तानचा हा युवा फलंदाज आपल्या फटकेबाजीने लक्ष वेधू शकतो. मात्र प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी होणाऱ्या या सामन्यात फक्त तंत्राचीच नव्हे, तर कौशल्याचीही कसोटी ठरणार आहे.

दर्जा आणि अंमलबजावणी या गोष्टींचा विचार केल्यास युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी हे पाकिस्तानच्या मोहम्मद हाफीझ आणि सर्फराझ खानपेक्षा उजवे ठरतात. सराव सामन्यात खेळू न शकलेला युवी रविवारी खेळू शकेल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. जर युवराज खेळू शकला नाही, तर दिनेश कार्तिकला संघात स्थान मिळू शकते. धडाकेबाज फलंदाज केदार जाधवच्या कारकीर्दीतील हा पहिलाच महामुकाबला असेल.

वादाच्या पाश्र्वभूमीवर संघातील वातावरण गंभीर असले तरी पाकिस्तानपेक्षा भारताचे पारडे जड मानले जात आहे.

१९ सप्टेंबर २००४, बर्मिगहॅम

पाकिस्तान ३ विकेट्स राखून विजय

भारत : ४९.५ षटकांत २०० (राहुल द्रविड ६७; नावेद-उल-हसन ४/२५) पराभूत वि. पाकिस्तान : ४९.२ षटकांत ७ बाद २०१ (युसूफ योहाना नाबाद ८१; इरफान पठाण ३/३४); सामनावीर – युसूफ योहाना.

२६ सप्टेंबर २००९, सेंच्युरियन

पाकिस्तान ५४ धावांनी विजय

पाकिस्तान : ९ बाद ३०२ (शोएब मलिक १२८; आशीष नेहरा ४/५५) वि. वि. भारत : ४४.५ षटकांत २४८ (राहुल द्रविड ७६; सईद अजमल २/३१); सामनावीर : शोएब मलिक

१५ जून २०१३, बर्मिगहॅम

भारत ८ विकेट्स राखून विजयी (डकवर्थ-लुइस नियम)

पाकिस्तान : ३९.४ षटकांत १६५ (असद शफिक ४१; भुवनेश्वर कुमार २/१९, रवींद्र जडेजा २/३०) पराभूत वि. भारत : १९.१ षटकांत २ बाद १०२ (शिखर धवन ४८); सामनावीर : भुवनेश्वर कुमार.

४ जून २०१७, बर्मिगहॅम

untitled-24