रविवारी झालेल्या सामन्यात भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ८९ धावांनी मानहानीकारक पराभव केला. भारताने विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानवर सलग सातव्यांदा विजय मिळवला. या विजयामुळे भारतात जल्लोषाचे वातावरण आहे. तर पाकिस्तानात शोककळा पसरली आहे. सामान्य दर्जाचे क्षेत्ररक्षण, नेतृत्व, संघनिवड आणि खराब कामगीरीमुळे पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. सध्या पाकिस्तानी संघावर चारीबाजूंनी टिका होत आहे. दरम्यान एका चाहत्याने पाकिस्तानी संघावरच बंदी घाला अशी विनंती कोर्टाला केली आहे.

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश एकमेकांचे कट्टर वैरी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे भारताविरुद्ध झालेला पराभव पाकिस्तानी चाहत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. समाजमाध्यमांवरून पाकिस्तानी क्रिकेट संघ व क्रिकेट बोर्डावर तुफान टिकेचा मारा होत आहे. दरम्यान एका नाराज चाहत्याने पाकिस्तानी क्रिकेट संघावरच बंदी घाला अशी विनंती करणारी एक याचिका कोर्टात दाखल केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील न्यायाधीश गुजरनवाला कोर्टाचुया यांनी या याचिकेची गांभीर्याने नोंद घेत पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला एक नोटस बजावली आहे.

या नोटीसमध्ये नेमके काय आहे, हे अद्याप जाहिर केले गेले नसले तरी यामुळे पाकिस्तानी क्रिकेट बोर्डात मोठ्या प्रमाणवर खळबळ माजली असल्याची माहिती जिओ या वृत्तवाहिनीने दिली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आज आपात्कालीन बैठक बोलावली आहे. या बैठकीत काही कठोर निर्णय घेतले जाणार आहेत. तसेच पाकिस्तानी क्रिकेट व्यवस्थापनासह, प्रशिक्षक आणि निवड समितीमध्येही अमुलाग्र बदल केले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.