02 March 2021

News Flash

अमेरिकेच्या भूमीवर आज भारत-वेस्ट इंडिज सामना

क्रिकेटच्या नव्या बाजारपेठेबाबत आयसीसी उत्सुक

| August 27, 2016 03:02 am

सराव करताना ख्रिस गेल

क्रिकेटच्या नव्या बाजारपेठेबाबत आयसीसी उत्सुक

क्रिकेटचा पसारा तसा मोजक्या काही राष्ट्रांपुरताच. पण अमेरिकासारख्या प्रगत राष्ट्रात शुक्रवारी या खेळाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. निमित्त आहे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्याचे. या सामन्यामुळे अमेरिकेची बाजारपेठ क्रिकेटसाठी खुली होणार आहे.

काही दिवसांपूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने सलग तिसरा कॅरेबियन दौरा यशस्वी करताना चार कसोटी सामन्यांची मालिका जिंकली होती. आता पाचदिवसीय क्रिकेटकडून भारतीय क्रिकेट मर्यादित षटकांच्या क्रिकेटकडे जात असताना महेंद्रसिंग धोनी पुन्हा नेतृत्वासाठी सज्ज झाला आहे. क्रिकेटसाठीच खास तयार करण्यात आलेल्या सेंट्रल ब्रोवर्ड रिजनल पार्क मैदानावर हे दोन ट्वेन्टी-२०  सामने खेळवण्यात येणार आहेत.

एकदिवसीय क्रिकेटच्या दर्जाचे हे एकमेव आयसीसी प्रमाणित स्टेडियम अमेरिकेत उपलब्ध आहे. याच ठिकाणी गेल्या महिन्यात सहा कॅरेबियन प्रीमियर लीगचे सामनेसुद्धा झाले होते.

डिसेंबर २०१४मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या धोनीला चालू वर्षांत फक्त सातच सामने खेळायचे आहेत. यापैकी दोन वेस्ट इंडिजविरुद्ध आहेत, तर त्यानंतर भारतात न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. याआधी त्याने झिम्बाब्वे दौऱ्यावर भारताच्या युवा संघाचे नेतृत्व केले होते. जून महिन्यात झालेल्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेत भारत जिंकला होता. अमेरिकेत क्रिकेटचे व्यासपीठ निर्माण होण्याच्या इराद्याने दर वर्षी तिथे सामने खेळवण्याचा मानस आहे.

कॅरेबियन दौऱ्यावर भारताने २-० अशा फरकाने कसोटी मालिका जिंकली. या दौऱ्यात पोर्ट ऑफ स्पेनला झालेल्या अखेरच्या कसोटीतील चार दिवस पावसामुळे वाया गेले. त्यामुळे खेळाडूंना पुरेसा सरावसुद्धा मिळालेला नाही.

धोनीसोबत भारतीय प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचे हे प्रथमच असल्यामुळे ते भारताच्या कामगिरीबाबत आशावादी आहेत. ते म्हणाले, ‘‘बऱ्याच वर्षांपूर्वी आम्ही एकत्रित खेळलो आहोत. गेले काही दिवस उत्तम संवादातून संघबांधणी सुरू आहे. त्याच्यासोबत सकारात्मक पद्धतीने भारताला यश मिळवून देऊ. जसप्रीत बुमराहला आयपीएलदरम्यान मी मार्गदर्शन केले होते.’’

वेस्ट इंडिज संघातील कार्लोस ब्रेथवेटकडे सर्वाचे लक्ष केंद्रित झाले आहे. कारण डॅरेन सॅमीला हटवून नेतृत्वाची धुरा त्याच्याकडे सोपवण्यात आली आहे. भारतात मार्च महिन्यात झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेत वेस्ट इंडिजने विजेतेपदाला गवसणी घातली होती. मात्र तरीही सॅमीची कर्णधारपदासह संघातून हकालपट्टी करण्यात आली.

ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ब्रेथवेटने सलग चार षटकारांची आतषबाजी करीत संघाला इंग्लंडविरुद्ध विजय मिळवून दिला होता. भारताविरुद्धच्या आव्हानाविषयी तो म्हणाला, ‘‘विंडीजसारख्या संघाचे नेतृत्व करणे सोपे असते. आमच्या ड्रेसिंग रूममध्ये असेच आनंदाचे वातावरण असते. त्यामुळे कुणाचाही अहंकार दुखावला असेल असे मला वाटत नाही.’’

कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियम ब्रेथवेटने दाखवलेल्या पराक्रमानंतरही त्याचा आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी पुरेसा विचार होत नाही. तो आतापर्यंत फक्त ३ कसोटी, १४ एकदिवसीय आणि ८ ट्वेन्टी-२० सामने खेळला आहे.

भारतीय संघसुद्धा ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आत्मविश्वासाने कामगिरी बजावत आहे. ऑस्ट्रेलिया, श्रीलंका भूमीवरील विजयानंतर भारताने आशिया चषक जिंकला होता. तर झिम्बाब्वेविरुद्ध भारताने २-१ असा विजय मिळवला होता. या आधी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत विंडीजकडून पराभवामुळे भारताचे आव्हान संपुष्टात आले होते. त्या पराभवाचे उट्टे फेडण्याचा निर्धार भारतीय संघाने केला आहे.

कॅरेबियन दौऱ्यातील १४ खेळाडूंपैकी १२ खेळाडू फ्लोरिडाला पोहोचले आहेत. भारतीय संघाच्या कामगिरीची मोठी उत्सुकता चाहत्यांना असली तरी प्रत्येक सामन्याला सरासरी १५ हजार क्रिकेट रसिक हजेरी लावण्याची शक्यता आहे.

संघ

  • भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, के. एल. राहुल, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, रोहित शर्मा, शिखर धवन, स्टुअर्ट बिन्नी, उमेश यादव, विराट कोहली.
  • वेस्ट इंडिज : कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), आंद्रे फ्लेचर, आंद्रे रसेल, ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो, ईव्हिन लेविस, जेसन होल्डर, जॉन्सन चार्लस, किरॉन पोलार्ड, लेंडल सिमन्स, मार्लन सॅम्युअल्स, सॅम्युअल ब्रदी, सुनील नरिन.

सामन्याची वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2016 3:02 am

Web Title: india vs west indies in t20 cricket in usa
Next Stories
1 सिंधूची ‘नाममुद्रा’ वधारली!
2 जैशाला स्वाइन फ्लू
3 मुंबई संघाची पसंती अंधेरी क्रीडा संकुलाला
Just Now!
X