पश्चिम ऑस्ट्रेलियावर ६४ धावांनी सहज विजय

रोहित शर्मा आणि मनीष पांडे यांच्या दमदार अर्धशतकानंतर गोलंदाजांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने दुसऱ्या सराव सामन्यात पश्चिम ऑस्ट्रेलिया इलेव्हन संघावर ६४ धावा राखून विजय मिळवला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारताची सुरुवात निराशाजनक झाली. शिखर धवन व विराट कोहली यांना दुहेरी आकडा गाठण्यात अपयश आले. मात्र रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या मुंबईकर खेळाडूंनी ९८ धावांची भागीदारी करून भारताचा डाव सावरला. रहाणे (४१) माघारी परतल्यानंतर मनीष पांडेने (५८) रोहितसह खिंड लढवत संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. निर्धारित ४९.१ षटकांत भारताचा संपूर्ण डाव २४९ धावांत संपुष्टात आला.

विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना जॅक कार्डेर व जेरॉन मॉर्गन वगळता पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या इतर फलंदाजांना रिषी धवन, रवींद्र जडेजा, आर. अश्विन आणि अक्षर पटेल यांच्यासमोर तग धरता आला नाही. त्यांचा संपूर्ण डाव ४९.२ षटकांत १८५ धावांत आटोपला.

संक्षिप्त धावफलक

भारत : ४९.१ षटकांत २४९ (रोहित शर्मा ६७़, अजिंक्य रहाणे ४१, मनीष पांडे ५८; ड्रेव पॉर्टर ५-३७) विजयी वि. पश्चिम ऑस्ट्रेलिया इलेव्हन : ४९.२ षटकांत १८५ (जॅक कार्डेर ४५, जेरॉन मॉर्गन ५०; रिषी धवन २-२८, रवींद्र जडेजा २-३८, आर. अश्विन २-३२, अक्षर पटेल २-२९).

शमीऐवजी भुवनेश्वरला संधी

स्नायूंच्या दुखापतींमुळे भारताला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळावे लागले आहे. शमीच्या जागी संघात मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात आली आहे. नऊ महिन्यांच्या विश्रांतीनंतर शमी पुन्हा दुखापतग्रस्त झाला आहे.