फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या महिला गटाने सुवर्ण कामगिरी केली आहे. भारतीय महिला रिकर्व टीमने ही कामगिरी करत इतिहास रचला आहे. दीपिका कुमारी, अंकिता भकत आणि कोमलिका बारी या महिला संघाने अंतिम फेरीत मॅक्सिकोचा पराभव केला. मॅक्सिकोचा ५-१ ने पराभव करत त्यांनी हे यश संपादन केलं आहे. ऑलिम्पिकच्या शेवटच्या क्वालिफायर फेरीतील पहिल्या टप्प्यात मिळालेल्या पराभवानंतर आलेली निराशा झटकून हे यश मिळवलं आहे. मात्र ही स्पर्धा ऑलिम्पिकसाठी क्वालिफाइंग स्पर्धा नाही.

या विजयानंतर वर्ल्ड आर्चरीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून भारतीय महिला संघाचं अभिनंदन केलं आहे. “भारताने सुवर्णपदक पटकावलं आहे”, असं ट्वीट वर्ल्ड आर्चरीने केलं आहे.

भारताच्या अभिषेक वर्माने अमेरिकेच्या क्रिस शाफचा पराभव करून विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यात शनिवारी वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदक पटकावले. रंगतदार अंतिम सामन्यात अभिषेकने क्रिसवर दोन गुणांनी निसटता विजय मिळवला. अभिषेकने सलग दुसरे वैयक्तिक विश्वचषक सुवर्णपदक पटकावले. याआधी २०१५च्या व्रॉकलॉ विश्वचषकात त्याने पदक प्राप्त केले होते.