आर. अश्विन आणि रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाचे फलंदाजांनी एका मागून एक नांगी टाकल्यामुळे दुसऱया कसोटीमध्ये यजमान भारताने ऑस्ट्रेलियावर एक डाव आणि १३५ धावांनी मंगळवारी विजय मिळवला. या विजयामुळे चार कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर २-० ने आघाडी घेतली. भारताचा कसोटी मालिकांमधील हा सर्वांत मोठा सहावा विजय आहे.
दुसऱया कसोटीमध्ये पहिल्यापासूनच ऑस्ट्रेलियाचे फलंदाज फार चमकदार कामगिरी करू शकले नाहीत. पहिल्या डावामध्ये ऑस्ट्रेलियाचे फलंदाज २३७ धावांपर्यंत मजल मारू शकले. तर त्यांचा दुसरा डाव अवघ्या १३१ धावांत संपुष्टात आला. दुसऱया डावामध्ये ऑस्ट्रेलियाचा कोणताच फलंदाज संघाचा डाव सावरू शकला नाही. अश्विन आणि जडेजाच्या गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी गुडघे टेकल्याचीच स्थिती होती. सलामीवीर ईडी कोवन याने संघासाठी दुसऱया डावात सर्वाधिक ४४ धावा केल्या. फिलिप ह्युजेस, मोजेस हेनरिक्स हे दोन्ही फलंदाज भोपळादेखील फोडू शकले नाहीत. भारताकडून अश्विनने ऑस्ट्रेलियाचे पाच आणि जडेजाने चार मोहोरे टिपले.
अंतिम धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) – ९ बाद २३७ (डाव घोषित)
भारत (पहिला डाव) – सर्वबाद ५०३
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) – सर्वबाद १३१
भारताचे कसोटीमधील आतापर्यंतचे सर्वांत मोठे विजय
बांगलादेशविरुद्ध २००७ मध्ये एक डाव २३९ धावांनी विजय
ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९९८ मध्ये एक डाव २१९ धावांनी विजय
न्यूझिलंडविरुद्ध २०१० मध्ये एक डाव १९८ धावांनी विजय
श्रीलंकेविरुद्ध २००९ मध्ये एक डाव १४४ धावांनी विजय
बांगलादेशविरुद्ध २००४ मध्ये एक डाव १४० धावांनी विजय