भारतीय युवा फुटबॉलपटूंसाठी जर्मनीची दारे खुली झाली आहेत, असे भारताच्या १७ वर्षांखालील संघाचे मुख्य प्रशिक्षक निकोलाय अ‍ॅडम यांनी सांगितले.
१७ वर्षांखालील गटाची विश्वचषक स्पर्धा भारतात आयोजित केली जाणार आहे.
‘‘पुढील वर्षी जर्मनीतील बुंदेल लीगमधील विविध संघांबरोबर मित्रत्वाचे सामने खेळण्याची आमची योजना आहे. त्यामुळे आमच्या खेळाडूंना उच्च दर्जाच्या खेळाडूंबरोबर खेळण्याचा अनुभव मिळणार आहे. त्याचा फायदा त्यांना विश्वचषक स्पर्धेसाठी होणार आहे,’’ असे अ‍ॅडम यांनी सांगितले.
भारताला १६ वर्षांखालील गटाच्या आशियाई फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीत इराण, बहरीन व लेबनॉन या तुल्यबळ संघांबरोबर खेळावे लागणार आहे. त्याबाबत अ‍ॅडम म्हणाले, ‘‘मी स्वत: इराणविरुद्ध सामने खेळलो आहे. फुटबॉलमध्ये चांगले कौशल्य दाखविणाऱ्या संघांमध्ये इराणचे स्थान आहे. या स्पर्धेसाठी ते विजेतेपदाचे दावेदार मानले जात आहेत.’’
अखिल भारतीय फुटबॉल असोसिएशनने १५ वर्षांखालील गटासाठी लीग स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे कौतुक करीत अ‍ॅडम म्हणाले, ‘‘प्रत्येक राज्यात ९, ११ व १३ वर्षांखालील गटासाठीही अशा लीग स्पर्धा आयोजित करण्याची गरज आहे. त्यामुळे या खेळाचा देशाच्या कानाकोपऱ्यात प्रसार होऊ शकेल. १७ वर्षांखालील संघामधील खेळाडूंच्या दर्जाविषयी आता मत व्यक्त करणे उचित ठरणार नाही. या खेळाडूंनी स्वप्ने पाहण्याऐवजी कठोर परिश्रमावर भर देण्याची गरज आहे. शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक तंदुरुस्तीसही अत्यंत महत्त्व आहे.’’