‘आयपीएल’च्या उर्वरित हंगामातील पहिल्या लढतीत मुंबईची चेन्नईशी गाठ

जैव-सुरक्षित वातावरणाचे चक्रव्यूह भेदून करोनाने शिरकाव केल्यामुळे ४ मे रोजी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या १४व्या हंगामाचा डाव अर्ध्यावरती मोडला. आता जवळपास साडेचार महिन्यांनंतर ‘आयपीएल’चा दुसरा डाव रविवारपासून पुन्हा सुरू होणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे कट्टर प्रतिस्पर्धी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने येतील. पुढील महिन्यात संयुक्त अरब अमिरातीतच ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार असल्याने ही लीग फार महत्त्वाची ठरणार असून, प्रेक्षकांच्या पुनरागमनामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावण्यात हातभार लागणार आहे.

  •  वेळ : सायंकाळी ७.३० वा.
  •  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर्स १, स्टार स्पोटर्स १ हिंदी (एचडी वाहिन्या)

मुंबई इंडियन्स  सहा ताऱ्यांवर लक्ष

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि राहुल चहर या सहा जणांची ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाल्याने आपसूकच त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. याशिवाय ट्रेंट बोल्ट, किरॉन पोलार्ड आणि क्विंटन डीकॉक या विदेशी त्रिकुटाने मुंबईसाठी सातत्याने योगदान दिले आहे. मुंबईने सुरुवातीपासूनच जम बसवल्यास यंदा सलग तिसऱ्यांदा चषक उंचावण्यापासून त्यांना रोखणे कठीण जाईल.

 चेन्नई सुपर किंग्ज  वचपा घेण्यासाठी सज्ज

‘आयपीएल’ स्थगित होण्यापूर्वी झालेल्या अखेरच्या लढतीत मुंबईनेच २१९ धावांचे लक्ष्य गाठून चेन्नईला धूळ चारली होती. त्या पराभवानंतरही महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई संघ गुणतालिकेत मुंबईपेक्षा वरच्या क्रमांकावर आहे. अष्टपैलू सॅम करन विलगीकरणामुळे या लढतीला मुकण्याची शक्यता असली, तरी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत छाप पाडणारा शार्दूल ठाकूर, रवींद्र जडेजा आणि दीपक चहर असे पर्याय चेन्नईकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे चेन्नईला गतपराभवाचा वचपा काढून गुणतालिकेत अग्रस्थान पटकावण्याची संधी आहे.

१९-१२ उभय संघांत आतापर्यंत ३१ ‘आयपीएल’ सामने झाले असून, यापैकी मुंबईने १९ आणि चेन्नईने १२ सामने जिंकले आहेत.