भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील पहिला टप्पा म्हणजेच टी२० मालिकेला सुरुवात झाली असून भारताने मालिकेत १-०ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात कुलदीप यादव याच्या फिरकीने कमाल दाखवली. वेगवान गोलंदाजांना मात्र अपेक्षित प्रभाव पाडता आला नाही. पण भारतीय वेगवान गोलंदाजांना जर इंग्लंडवरील खेळपट्ट्यांवर प्रभावी कामगिरी करायची असेल, तर त्यासाठी काय करायला हवे, याचा कानमंत्र माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याने दिला आहे.

एका मुलाखतीत बोलताना राहुल द्रविड म्हणाला की भारतीय गोलंदाजांना इंग्लंडमधील खेळपट्ट्यांवर उत्तम कामगिरी करायची असेल, तर त्यासाठी गोलंदाजांनी सर्वप्रथम तंदुरुस्त असणे, हे सर्वात महत्वाचे आहे. २००७ साली इंग्लंड दौऱ्यावर असताना आम्ही आमच्या संघातील वेगवान गोलंदाजांना तंदुरुस्त राहण्यासाठी मदत केली होती. त्याचा फायदा आम्हाला त्या दौऱ्यात झाला होता. सध्याच्या भारतीय संघातही उत्तम वेगवान गोलंदाज आहेत. जर हे गोलंदाज तंदुरुस्त राहू शकले, तर इंग्लंडच्या फलंदाजांची ते धूळधाण उडवतील, असा विश्वास द्रविडने व्यक्त केला.

खेळपट्ट्यांबद्दल बोलताना द्रविड म्हणाला की इंग्लंडच्या संघात जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड हे दोघे सामना जिंकवून देणारे गोलंदाज आहेत. पण त्यांनाही खेळपट्टीकडून मदत मिल्ने आवश्यक आहे. आणि तशातच सध्याचा इंग्लंडचा संघ फलंदाजीमध्ये थोडासा दुबळा आहे. लॉर्ड्सवर पाकिस्तानच्या गोलंदाजांपुढे त्यांच्या संघातील फलंदाजांनी शरणागती पत्करली होती. त्यामुळे कसोटी सामन्यांमध्ये भारताविरुद्ध फिरकीला पोषक खेळपट्टी टाळण्याकडे इंग्लंडचा कल असेल, असा अंदाज आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना येथे कमाल दाखवणे आवश्यक असेल, असेही तो म्हणाला.