ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्त या भारतीय मल्लाबरोबरच अनेक नामवंत परदेशी मल्ल येथे चार जानेवारी रोजी होणाऱ्या पुणे महापौर केसरी चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सहभागी होत आहेत. स्पर्धेसाठी साठ लाख रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
वारजे माळवाडी येथे होणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन पुणे महानगरपालिकेतर्फे केले जाणार आहे. या मैदानात २१ आंतरराष्ट्रीय लढती होणार आहेत. त्यामध्ये भारत, तुर्कस्तान, पाकिस्तान, इराण, ऑस्ट्रेलिया या देशांच्या मल्लांचा समावेश असेल. योगेश्वर दत्त याला ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय विजेता मुस्तफा राजिफेर याच्याशी लढत द्यावी लागणार आहे. या कुस्तीकरिता सात लाख रुपयांचे इनाम ठेवण्यात आले आहे. हिंदकेसरी मौसम खत्री याची इराणच्या यजदोन याच्याशी कुस्ती होईल तर राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता नरसिंग यादव याच्यापुढे तुर्कस्तानच्या अली महमंद याचे आव्हान असेल. महाराष्ट्र केसरी सईद चाऊस याची पाकिस्तानच्या जुनेर खान याच्याशी लढत होईल. महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील व रुस्तुम-ए-पाकिस्तान हमीद अली खान यांच्यात सामना होईल. महाराष्ट्र केसरी समाधान घोडके हा इराणच्या महंमदी खान याच्याशी झुंज देईल.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील २१ कुस्त्यांबरोबरच राष्ट्रीय स्तरावरील २४ कुस्त्यांसह एकूण दीडशे कुस्त्यांचे आयोजन केले जाणार आहे. मातीच्या आखाडय़ात सर्व कुस्त्या होणार असून ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता सुशीलकुमार, त्याचे प्रशिक्षक सतपालसिंह, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, श्रीपती खचनाळे, पद्मश्री कर्तारसिंग, हिंदकेसरी दीनानाथसिंह आदी ज्येष्ठ मल्लही उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेसाठी ५० हजार प्रेक्षक बसू शकतील एवढी गॅलरी उभारण्यात येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन ४ जानेवारीस दुपारी दोन वाजता महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते होणार असून स्पर्धेचा समारोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्याच दिवशी सायंकाळी होईल.