मुझुमदार, बहुतुले, कुलकर्णी यांच्यात चुरस

मुंबई :अव्वल प्रथम श्रेणी क्रिकेटपटू अमोल मुझुमदार, भारताचा माजी फिरकीपटू साईराज बहुतुले आणि माजी प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांच्यात मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी चुरस रंगणार आहे.

मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) गेल्या आठवडय़ात मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले होते.  सोमवारी अर्ज करण्याच्या अखेरच्या दिवशी मुझुमदार, बहुतुले आणि कुलकर्णी या प्रमुख उमेदवारांनी मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केले.  आठवडय़ाभरात काही उमेदवारांच्या मुलाखतील घेऊन क्रिकेट सुधारणा समिती निर्णय घेईल, अशी माहिती मिळत आहे.

मुझुमदार सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत असून त्याने राजस्थान रॉयल्स तसेच दक्षिण आफ्रिका संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदाची भूमिका निभावली आहे. बहुतुलेने विदर्भ, केरळ, बंगाल संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले असून गेल्या दोन मोसमात तो गुजरातच्या प्रशिक्षकपदी आहे. कुलकर्णी यांनी मुंबईला २०१२-१३मध्ये रणजी जेतेपद मिळवून दिले होते. त्यांनी विदर्भ व छत्तीसगढचेही प्रशिक्षकपद भूषवले आहे.