अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाचा घरच्या मैदानावर चेन्नई सुपरकिंग्ज संघासोबत सामना रंगला आहे. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थानची फलंदाजी पुन्हा एकदा ढेपाळली. शेवटच्या षटकात केलेल्या फटकेबाजीमुळे राजस्थानने 151 अशी सन्मानजनक धावसंख्या गाठली. अजिंक्य रहाणेलाही या सामन्यात फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र सामना सुरु होण्यासाठी अजिंक्यने आपली एक जबाबदारी चोख बजावली. अजिंक्यची पत्नी राधिकाचा गुरुवारी वाढदिवस असतो.

सामन्याला निघण्याआधी अजिंक्यने राधिकासोबत केक कापत, तिची इच्छा पूर्ण केली. या छोटेखानी सेलिब्रेशनचे फोटो राजस्थान रॉयल्सने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत.

दरम्यान, चेन्नईच्या गोलंदाजांनी टिच्चून केलेल्या माऱ्याच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्ज संघाने यजमान राजस्थान रॉयल्सला 151 धावांवर रोखण्यात यश मिळवलं. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा महेंद्रसिंह धोनीचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. अजिंक्य रहाणे आणि जोस बटलर जोडीने राजस्थानला आश्वासक सुरुवात करुन दिली. मात्र दिपक चहरने रहाणेला माघारी धाडत राजस्थानला पहिला धक्का दिला. यानंतर राजस्थानच्या डावाला गळतीच लागली.

दिपक चहर, शार्दुल ठाकूर, रविंद्र जाडेजा आणि मिचेल सँटनर यांनी ठराविक अंतराने राजस्थानच्या प्रमुख फलंदाजांना माघारी धाडणं सुरु ठेवलं. संजू सॅमसन, राहुल त्रिपाठी, स्टिव्ह स्मिथ यांच्याकडून राजस्थानला अपेक्षा होत्या, मात्र ते सपशेल फोल ठरले. अखेरच्या फळीत बेन स्टोक्सने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र दिपक चहरने त्याचा त्रिफळा उडवला. चेन्नईकडून चहर-जाडेजा आणि ठाकूर या त्रिकुटाने प्रत्येकी 2-2 बळी घेतले, त्यांना सँटनरने एक बळी घेत चांगली साथ दिली.