किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात शनिवारी प्रथम फलंदाजी करताना १६३ धावांपर्यंत मजल मारली. पंजाबचा सलामीवीर ख्रिस गेल याने दिल्लीच्या गोलंदाजांचे कंबरडे मोडले. त्याने दणकेबाज खेळी करत ३७ चेंडूत ६९ धावा केल्या. त्याच्या खेळीत ६ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. त्यामुळे त्याच्या खेळीची जोरदार चर्चा रंगली. पण त्यापेक्षा अधिक चर्चा झाली ती त्याचा झेल टिपण्याच्या पद्धतीची….
गेलने जोरदार प्रहार करत चेंडू सीमारेषेजवर टोलवला. तो गेलचा सहावा षटकार होतो की काय असे चाहत्यांना वाटत असतानाच कॉलिन इन्ग्राम याने अत्यंत चपळाईने तो चेंडू सीमारेषेवर उडी मारत झेलला, पण त्याचा तोल गेला. आता झेल सुटणार असे साऱ्यांना वाटले असतानाच त्याने तो चेंडू मैदानात फेकला आणि तो स्वतः सीमारेषेवर पडला. पण त्याने फेकलेला चेंडू थेट दुसरा क्षेत्ररक्षक अक्षर पटेल याच्या हातात जाऊन विसावला.
पहा व्हिडीओ –
WATCH: Ingram-Axar’s perfect relay catch
Full video here https://t.co/GBheBXTuTq #DCvKXIP pic.twitter.com/kTgWx7VgPe
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2019
दरम्यान, नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय दिल्लीच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत असताना ख्रिस गेलने एक बाजू लावून धरत संघाला आश्वासक धावसंख्या गाठून दिली. पहिल्यांदा फलंदाजीची संधी मिळालेल्या पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही. लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, डेव्हिड मिलर हे फलंदाज झटपट माघारी परतले. यानंतर ख्रिस गेलने मनदीप सिंहच्या साथीने भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. यादरम्यान ख्रिस गेलने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. ही जोडी फुटल्यानंतर पंजाबचा संघ पुन्हा एकदा कोलमडला. यानंतर हरप्रीत ब्रार आणि रविचंद्रन आश्विन यांनी अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत संघाला आश्वासक धावसंख्या गाठून दिली. हा सामना जिंकण्यासाठी दिल्लीला १६४ धावांचं आव्हान आहे. पंजाबकडून संदीप लामिच्छानेने ३, अक्षर पटेल आणि कगिसो रबाडाने प्रत्येकी २-२ बळी घेतले.