मोहाली : सलग सहा पराभवांची मालिका खंडित करण्याच्या निर्धारानेच विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचा संघ इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये शनिवारी चौथ्या स्थानावर असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबशी भिडणार आहे.

बेंगळूरुची ‘आयपीएल’मधील कामगिरी कोणत्याही स्थितीत उंचावत नाही, हेच दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभवानंतर स्पष्ट झाले आहे. कोहलीला नुकताच ‘विस्डेन’चा बहुमान मिळाला आहे. यातून प्रेरणा घेत बेंगळूरुसाठी ‘आयपीएल’मधील विजयाचे दार तो खुले करील, अशी आशा आहे. आता ‘आयपीएल’च्या बाद फेरीचे आव्हान टिकवण्यासाठी बेंगळूरुला उर्वरित आठही सामने जिंकण्याची आवश्यकता आहे.

बेंगळूरुची फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये अनिश्चितता आढळत आहे. बेंगळूरुकडे यजुर्वेद्र चहलसारखा किमयागार गोलंदाज आहे, परंतु अन्य गोलंदाजांकडून त्याला पुरेशी साथ मिळत नाही. बेंगळूरुच्या फलंदाजांमध्येही सातत्याचा अभाव जाणवत आहे.

पंजाबने आतापर्यंतच्या सात सामन्यांपैकी चार सामने जिंकले आहेत. याचप्रमाणे घरच्या मैदानावर वर्चस्व राखले आहे. याआधीच्या सामन्यात मुंबईने पंजाबचे १९७ धावांचे लक्ष्य आरामात पेलले होते. या सामन्यात सलामीवीर लोकेश राहुलने शतक झळकावले, तर ख्रिस गेलसुद्धा दर्जाला साजेसा खेळला.

* सामन्याची वेळ : रात्री ८ वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १