भारतात सध्या IPL चा माहोल आहे. सर्वत्र IPL ची चर्चा सुरू आहे. या दरम्यान BCCI ने महिला क्रिकेटपटूसाठीही छोटेखानी IPL स्पर्धा आयोजित केली आहे. ६ ते ११ मे या कालावधीत तीन संघांमध्ये ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. ‘वुमन्स टी २० चॅलेंज’ असे या स्पर्धेचे नाव असून या स्पर्धेत सुपरनोव्हाज, ट्रेलब्लेझर्स आणि व्हेलॉसिटी हे ३ संघ एकमेकांशी भिडणार आहेत. तर ३ सामन्यांनंतर गुणतालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावरील संघात या वुमन्स IPLची अंतिम फेरी रंगणार आहे.

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हे सामने खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेत भारतातील आणि जगातील आघाडीच्या महिला क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. गेल्या वर्षी IPL मध्ये दोन संघांमध्ये महिलांची IPL स्पर्धा खेळवण्यात आली होती. त्यात स्मृती मानधनाचा ट्रेलब्लेझर्स संघ आणि हरमनप्रीत कौरचा सुपरनोव्हाज संघ यांच्यात IPL सामने झाले होते.

हा सामना प्रदर्शनीय पद्धतीचा होता. या सामन्यात परदेशी महिला क्रिकेटपटू एलिस पेरी, मेग लॅनिंग, एलिसा हिली, बेथ मूनी, सूजी बॅट्स आणि सोफी डेव्हीयन यांचा समावेश होता. या सामन्यांच्या यशामुळे आता या वर्षी ३ संघामध्ये स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षीही सामन्यांचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे.

असे रंगतील ‘वुमन्स टी २० चॅलेंज’चे सामने

६ मे – सुपरनोव्हाज वि. ट्रेलब्लेझर्स
८ मे – ट्रेलब्लेझर्स वि. व्हॅलोसिटी
९ मे – सुपरनोव्हाज वि. व्हॅलोसिटी
११ मे – अंतिम सामना

‘वुमन्स टी २० चॅलेंज’ चे सामने पुरुष IPL 2019 चे साखळी सामने संपल्यानंतर होणार आहेत. हे सर्व सामने जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार आहेत. या संघातील खेळाडू कोण कोण असतील याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.