आपल्या पहिल्या विजेतेपदाचं स्वप्न उराशी घेऊन मैदानात उतरलेल्या RCB च्या संघाचं पुन्हा एकदा स्वप्न भंगलं आहे. अबु धाबीच्या मैदानावर झालेल्या सामन्यात हैदराबादने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर ६ गडी राखून मात केली. या पराभवासह RCB चं स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं आहे. विजयासाठी दिलेलं १३२ धावांचं हैदराबादकडून विल्यमसन-होल्डरने संयमी फलंदाजी करत पूर्ण केलं. विल्यमसनने नाबाद अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. यानंतर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर यानं आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीवर निशाणा साधला आहे. “आता वेळ आली आहे जेव्हा बंगळुरूला कर्णधारपदासाठी विराट कोहलीच्या पुढे विचार करावा लागेल. जर बंगळुरूच्या टीम मॅनेजमेंटमध्ये आपण असतो तर विराटला कर्णधारपदावरून हटवलं असतं,” असं मत गंभीरनं व्यक्त केलं.

“आता संधी आहे जेव्हा विराट कोहलीनं पुढे यावं आणि याची जबाबदारी स्वीकारावी,” असं गंभीरनं क्रिकइन्फोशी बोलताना सांगितलं. जर फ्रेन्चायझीचे प्रभारी असता तर संघाचा कर्णधार बदलला असता का ? असा सवाल गंभीरला करण्यात आला होता. “१०० टक्के… समस्या उत्तर देण्यात आहे. कोणत्याही स्पर्धेत आठ वर्ष हा मोठा कालावधी असतो. कर्णधाराच्या बाबतीत विसरून जा. पण कोणताही असा खेळाडू सांगा जो आठ वर्ष झाली असेल आणि एकदाही स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं नाही. एका कर्णधाराला उत्तर देणं आवश्यक आहे,” असंही गंभीरनं सांगितलं.

“ही केवळ या वर्षाची गोष्ट नाही. मी विराटच्या विरोधात बिलकुल नाही. परंतु कुठे ना कुठे त्याला यासाठी मी जबाबदार आहे असं म्हणत जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे,” असंही त्यानं सांगितलं. “आठ वर्ष हा मोठा कालावधी आहे. रविचंद्रन अश्विनच्या बाबतीत काय घडलं? किंग्स इलेव्हन पंजाबमध्ये त्याची कामगिरी उत्तम झाली नाही त्यानंतर त्याला हटवण्यात आलं. आपण धोनीच्या, रोहितच्या बाबत चर्चा करतो. परंतु विराट कोहलीबाबत बिलकुल बोलत नाही. धोनीनं तीन वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्मानं चार वेळा. स्वत:ला सिद्ध केल्यामुळेच त्यांनी मोठ्या कालावधीसाठी कर्णधारपद भूषवलं आहे. रोहितनं आठ वर्षांपर्यंत स्वत:ला सिद्ध केलं नसतं तर त्यालाही हटवण्यात आलं असतं याची मला खात्री आहे. निरनिराळ्या लोकांसाठी निरनिराळी गोष्टी असू नये,” असंही गंभीरनं स्पष्ट केलं.