दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगने पृथ्वी शॉबाबत एक खुलासा केला आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात जेव्हा पृथ्वी शॉ खराब फॉर्ममध्ये होता त्यावेळी त्याने नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करण्यास नकार दिला होता, असं पाँटिंगने सांगितलं. तसेच, या प्रतिभावान फलंदाजाने आगामी स्पर्धेपूर्वी आपल्या ट्रेनिंगच्या सवयीत सुधारणा केली असेल अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली.

९ एप्रिलपासून यंदाच्या आयपीएलला सुरूवात होत आहे. त्यापूर्वी पाँटिंगने ‘क्रिकेट.कॉम.एयू’सोबत बातचित करताना सांगितलं की, जेव्हा पृथ्वी शॉ चांगल्या फॉर्ममध्ये असतो, त्याच्या बॅटीतून धावा निघत असतात त्यावेळी तो नेट्समध्यही सतत फलंदाजी करतो. पण, फॉर्म चांगला नसतो तेव्हा तो नेट्समध्येही फलंदाजी करण्यास नकार देतो. गेल्या हंगामात पृथ्वी शॉने फलंदाजीचा सराव करण्यास नकार दिला होता त्याबाबत पाँटिंग बोलत होता.

पाँटिंग म्हणाला की, “त्याने चार-पाच सामन्यांमध्ये १० पेक्षा कमी धावा केल्या होत्या. त्यामुळे मी त्याला आपण नेट्समध्ये जायला हवं आणि नेमकी समस्या काय आहे ते शोधायला हवं असं म्हटलं. त्यावर त्याने माझ्या डोळ्यात डोळे घालून, नाही…मी आज फलंदाजी करणार नाही असं उत्तर दिलं. मला हे कळलंच नाही”. पुढे बोलताना, “कदाचित आता तो बदलला असेल. मला माहितीये गेल्या काही महिन्यांमध्ये त्याने बरीच मेहनत घेतलीये. त्याचा सिद्धांत बदलला असावा आणि मला आशा आहे हा बदल झाला असेल कारण, आपण त्याच्याकडून सर्वोत्कृष्ट कामगिरी करुन घेतली तर तो सुपरस्टार खेळाडू बनू शकतो” असं पाँटिंग म्हणाला. मी आशा करतो यावेळी त्याने कामगिरी उंचावण्यासाठी स्वतःची ट्रेनिंगची सवय बदलली असेल. कारण, त्याचं यश केवळ दिल्ली कॅपिटल्ससाठी नाही तर मला विश्वास आहे की पुढील वर्षांमध्ये तो भारतासाठीही खूप क्रिकेट खेळताना दिसेल, असंही पाँटिंगने नमूद केलं. पुढे बोलताना पाँटिंगने पृथ्वी आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांच्यात बरंच साम्य आहे असंही म्हटलं. ‘त्याची उंची कमी आहे….(सचिन) तेंडुलकरप्रमाणे तो चेंडू फ्रंट आणि बॅकफुटवरही ताकदीने टोलवतो आणि फिरकीही चांगली खेळतो, असं पाँटिंगने सांगितलं.

दरम्यान, अलिकडेच झालेल्या विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेत पृथ्वी दमदार फॉर्ममध्ये होता. एकू चार शतकांच्या मदतीने स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू तो ठरला.