‘भारताची फुलराणी’ असा किताब पटकावणाऱ्या सायना नेहवालला चीन सुपरसीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या निमित्ताने आणखी एक संधी मिळणार आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करणारी युवा पी. व्ही. सिंधू दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू शकणार नाही. पुरुषांमध्ये पारुपल्ली कश्यप, किदम्बी श्रीकांत यांच्यावर भारताची भिस्त असणार आहे.
पुल्लेला गोपीचंदऐवजी विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना सायनाला पहिल्या जेतेपदाची प्रतीक्षा आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल पाचमध्ये परतलेल्या सायनाची सलामीची लढत सायाका ताकाहाशीशी होणार आहे. सायनाने ताकाहाशीविरुद्धची एकही लढत गमावलेली नाही. हा अडथळा पार केल्यास सायनाला दुसऱ्या फेरीत चीनच्या जिनजिंग क्विनचा सामना करावा लागणार आहे. मात्र २४ वर्षीय सायनासमोर खरे आव्हान उपान्त्यपूर्व फेरीत ली झेरुईच्या रूपात उभे ठाकणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरची चीनची मक्तेदारी मोडून काढणाऱ्या सायनाला यंदाच्या वर्षांत मात्र चीनच्या खेळाडूंनी निष्प्रभ केले आहे. विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना सायनाला चीनची भिंत सर करण्याचे मोठे आव्हान आहे. सिंधूच्या अनुपस्थितीमुळे महिला एकेरीत सायना ही भारताची एकमेव प्रतिनिधी आहे.
पुरुषांमध्ये पारुपल्ली कश्यपच्या कामगिरीत राष्ट्रकुल सुवर्णपदकानंतर घसरण झाली आहे. या स्पर्धेद्वारे शेवटच्या टप्प्यांपर्यंत जाण्याचा कश्यपचा मानस असेल. कश्यपची सलामीची लढत हाँगकाँगच्या नन वेईशी होणार आहे. यंदाच्या वर्षांत जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या एच. एस. प्रणॉयला डेन्मार्कच्या व्हिक्टर अक्सलेसनचा सामना करायचा आहे. आरएमव्ही गुरुसाईदत्त आणि किदम्बी श्रीकांत आमनेसामने आहेत. पुरुष दुहेरीत मनू अत्री-सुमीत रेड्डी जोडीची पहिली लढत चीनच्या झिओलाँग लियू-झिहान क्विअूशी होणार आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर प्राजक्ता सावंतचे सुपर सीरिज स्पर्धेत पुनरागमन होत आहे.